लिफ्ट मागणं बेतलं जीवावर; वाळूच्या डंपरनं दिलेल्या धडकेत दुचाकी घुसली चालत्या बसमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 13:42 IST2021-03-09T13:39:03+5:302021-03-09T13:42:38+5:30
Accident : डंपरसह चालक धीरज मोहन धनगर (१८,रा.कडगाव, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लिफ्ट मागणं बेतलं जीवावर; वाळूच्या डंपरनं दिलेल्या धडकेत दुचाकी घुसली चालत्या बसमध्ये!
जळगाव : रेमंड कंपनीत जाण्यासाठी दुचाकीवरुन आलेल्या कंपनीच्याच सहकाऱ्याकडे लिफ्ट मागितली अन् अवघ्या एक मिनिटातच मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली व त्यात दुचाकी पुढे चालणाऱ्या एस.टी.बसमध्ये घुसली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (५७,रा.सिंधी कॉलनी) हे जागीच ठार झाले तर दुचाकीस्वार अक्षय विजय पाटील (३०,रा.शिवम नगर, निमखेडी परिसर) हा तरुण गंभीर झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता इच्छा देवी चौकानजीकच्या सिध्दिविनायक हॉस्पीटलमसमोर झाला. डंपरसह चालक धीरज मोहन धनगर (१८,रा.कडगाव, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दार्थ मोरे हे रेमंड कंपनीत कामाला होते. रोज सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी ते घरुन इच्छा देवी चौकापर्यंत चालत यायचे. तेथून कंपनीत जाणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीच्या दुचाकीवर बसून ड्युटीवर जायचे. त्याप्रमाणेच मंगळवारी ते चालत इच्छा देवी चौकात आले. त्याचवेळी ड्युटीवर जाणाऱ्या अक्षय विजय पाटील या सहकाऱ्याकडे त्यांनी लिफ्ट मागितली. दुचाकीवरुन(क्र.एम.एच.१९ सी.एल.६७७७) पुढे जायला निघताच अवघ्या एका मिनिटात मागून आलेल्या वाळूच्या डंपरने (क्र.एम.एच.०४ जी.ए.३४९२) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ही दुचाकी पुढे चालणाऱ्या जळगाव-जामनेर बसमध्ये घुसली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मागे बसलेले मोरे जागीच गतप्राण झाले तर दुचाकीस्वार अक्षय याची मांडी फाटली असून छाती व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. मोरे यांना जिल्हा रुग्णालयात तर अक्षय याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.