असोद्यात पतीने पत्नीला जीवंत पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 09:02 PM2020-07-02T21:02:28+5:302020-07-02T21:02:45+5:30
अंगावर ओतले आॅईल : पती फरार,दोन नंदांना अटक
जळगाव : कौटुंबिक व आर्थिक कारणातून पतीने पत्नीच्या अंगावर आईल ओतून पेटवून दिल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजता असोदा, ता.जळगाव येथे घडली. या घटनेत कांचन संतोष नन्नवरे (३०) ही विवाहिता गंभीर जखमी झाली असून पती संतोष प्रकाश नन्नवरे, नणंद आशा शांताराम साळुंखे (रा.शिव कॉलनी) व सपना अमृत सोनवणे (रा.घार्डी, ता.जळगाव) या तिघांविरुध्द गुरुवारी तालुका पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोनही नंदांना पोलिसांनी अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील असोदा येथे जखमी कांचन ही पती संतोष प्रकाश नन्नवरे, सासरे प्रकाश रामादास नन्नवरे, मुले सारंग, संग्राम व मुलगी विशाखा यांच्यासह वास्तव्याला आहे. गेल्या आठ दिवसांपासून नणंद आशा शांताराम साळुंखे व सपना अमृत सोनवणे या असोदा येथे आलेल्या आहेत. तेव्हापासून दोनही जण किरकोळ कारणांवरुन कांचन यांच्याशी भांडण करीत आहेत. त्यात सासरे प्रकाश नन्नवरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पती संतोष याने भाऊ दिनेश व त्याची पत्नी माधुरी यांनाही बुधवारी असोदा येथे बोलावून घेतले आहे. सासऱ्यांच्या बॅँक खात्यात मोठी रक्कम असल्याने या कारणावरुन देखील नणंद कांचनशी वाद घालत होत्या. बुधवारी सायंकाळी पाच वाजता पती व दोनही नंदा यांनी कांचनसोबत भांडण केले. ‘तु माहेरी निघुन जा, वडीलांचे निधन झाल्यानंतर आम्ही त्यांचे सर्व काही करुन घेऊ’ असे सांगून भांडण केले तर ाती संतोष याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रात्री १० वाजता कांचन घराच्या मागच्या बाजुस लघुशंकेसाठी गेल्या असता पती संतोष याने मागुन येऊन अंगावर आॅईल फेकले व नंतर आगकाडीने पेटविले. या प्रकारामुळे कांचन यांनी आरडाओरड व किंचाळ्या मारल्याने आवाज ऐकून दीर दिनेश व दिराणी माधुरी यांनी घराबाहेर धाव घेतली. दोघांनी कांचनच्या अंगावर चादरी टाकुन त्यांना विझवले व तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत कांचन ५० टक्के भाजल्या गेल्या आहेत. कांचन यांनी गुरुवारी फिर्याद दिली. त्यानुसार पती संतोष, नंदा आशा व सपना या तिघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.