महिनाभराआधीच महापौरपदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:29+5:302021-02-08T04:14:29+5:30
ज्योती चव्हाणांनी घेतली महाजनांची भेट : इच्छुक वाढल्याने पक्ष नेतृत्वासमोर पेच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मनपा महापौर व ...
ज्योती चव्हाणांनी घेतली महाजनांची भेट : इच्छुक वाढल्याने पक्ष नेतृत्वासमोर पेच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १० मार्च रोजी संपणार आहे. महापौरपदासाठी अजून महिनाभराचा कार्यकाळ शिल्लक असतानाच इच्छुकांनी आतापासूनच महापौरपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. यासह इतर इच्छुकांनीदेखील जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्याकडे देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर अद्यापतरी भाजपवर कोणताही परिणाम झालेला नाही. पुढील महिन्यात महापौर, उपमहापौर पदाची निवड होणार असून, यादरम्यान काही घडामोडी घडण्याचीही शक्यता बोलली जात आहे. त्यासाठी भाजपने खबरदारी घेतली असून, प्रत्येक नगरसेवकाला मनपात स्थान देण्याचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, स्पष्ट बहुमत असले तरी स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी भाजपला व्हिप काढावा लागला होता. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे.
१० महिन्यांप्रमाणे ३ जणांना मिळणार संधी
भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर महापौरांना १० महिन्यांचा कार्यकाळ देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीमुळे पहिल्या महापौर सीमा भोळे यांना १६ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. तर भारती सोनवणे यांना १४ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला आहे. महापौरपदाचा कार्यकाळ १० मार्च रोजी संपणार आहे. दरम्यान, इच्छुकांची संख्या वाढली असल्याने ३ जणांना प्रत्येकी १० महिन्यांचा कार्यकाळ देऊन पुढील २० महिन्यांचा कार्यकाळ निश्चित केला जाणार आहे. मात्र, पहिल्यांदा संधी मिळावी यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
हे आहेत इच्छुक
मनपा निवडणुकीच्या वेळेस अनेकांनी इतर पक्षातून भाजपत प्रवेश केला होता. तेव्हा अनेकांना महापौरपदासाठी शब्द दिला होता. यामध्ये प्रतिभा कापसे यांचे नाव आघाडीवर आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपत लेवा समाजातील नगरसेवकांना मोठे पद देऊन समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळे, सिंधू कोल्हे, मीनाक्षी पाटील यांचे नाव देखील आघाडीवर आहे. तसेच पक्षाकडून अद्यापपर्यंत स्थायी समिती सभापतीपद वगळता मराठा समाजातील नगरसेवकाला अद्याप मोठे पद मिळाले नाही. त्यामुळे ज्योती चव्हाण यांनादेखील पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे.
महापौरपद महिलेसाठी आरक्षित
पहिल्या अडीच वर्षासाठी ओबीसी महिला यासाठी महापौरपद आरक्षित होते. तर दुसऱ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी महिलांचा खुला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित आहे. त्यामुळे इतर नगरसेवकांनी महापौरपदापेक्षा उपमहापौरपदासह गटनेते, सभागृहनेते व स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रयत्न केले आहेत. यासह स्वीकृत नगरसेवकदेखील पुढील महिन्यातच बदलण्यात येणार असून, यासाठी डॉ.राधेश्याम चौधरी व प्रा.जीवन अत्तरदे यांचे नाव आघाडीवर आहे.