हातेड येथील जि.प.सदस्यास मारहाण, मात्र गुन्हा दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 09:52 PM2020-10-02T21:52:48+5:302020-10-02T21:53:10+5:30
वाळूचे ट्रॅक्टर पकडून देण्याच्या संशयावरून व इतर कामांमध्ये सातत्याने व्यत्यय आणत असल्याच्या संशयावरून जि.प.सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांना मारहाण केली.
जळगाव : वाळूचे ट्रॅक्टर पकडून देण्याच्या संशयावरून व इतर कामांमध्ये सातत्याने व्यत्यय आणत असल्याच्या संशयावरून हातेड बुद्रूक, ता.चोपडा येथील रहिवासी तथा भाजपचे जि.प.सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांना हातेड खुर्द व भार्डू दरम्यान असलेल्या नाल्यात २५-३० जणांनी जबर मारहाण केली. मारहाण करताना लाठ्या-काठ्यांंचा वापर झाल्याची चर्चा तालुकाभर सुरू होती. २ रोजी सकाळी ही घटना घडली.
या मारहाणीत चुंचाळे-अकुलखेडा गटाचे जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे यांना जबर मुका मार लागला असून, शरीराचे अवयवही फ्रॅक्चर झाल्याचे समजले आहे. चोपडा शहरातील एका खासगी एक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांना याबाबत विचारले असता मारहाण झाल्याचे सांगितले. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण होऊनही पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला कोणी न आल्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून समजले आहे.
२ रोजी सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान भार्डू-हातेड खुर्द दरम्यान ही मारहाण झाली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये नेमके कोण होते हे गजेंद्र सोनवणे यांनी सांगितले नाही. फिल्मी स्टाईल मारहाण झाल्याची चर्चा तालुकाभर पसरलेली आहे.
याबाबतीत गजेंद्र सोनवणे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता मारहाण झाली आहे, मात्र गुन्हा दाखल झाला की नाही, मी दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्या बाबतीत मी सांगू शकत नाही, असे सांगितले.
फिर्याद द्यायला कोणीही न आल्याने गुन्हा दाखल नाही- पो.नि. संदीप आराक
दरम्यान, या घटनेबाबत ‘लोकमत’ने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या गुन्ह्याबाबत फिर्याद द्यायला कोणीही पुढे न आलेले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही, परंतु या मारहाणीत जे साहित्य वापरले आहे ते साहित्य वापरणाºया आरोपींचा शोध घेणे सुरू आहे, असे सांगितले.