विधानसभा निवडणूक : जळगावात राष्टÑवादीकडून इच्छुकांची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:23 PM2019-06-28T12:23:09+5:302019-06-28T12:23:44+5:30
१ जुलैपर्यंत प्रक्रिया
जळगाव : आगामी निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेसकडून ९ विधानसभा मतदार संघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. आॅन लाईन व आॅफ लाईनपद्धतीने हे अर्ज स्विकारले जात आहेत. यासाठी मात्र इच्छुकांकडून पाच हजाराचा पक्ष निधीही घेतला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून पुन्हा नव्या जोमाने निवणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. ११ पैकी नऊ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची या पक्षाची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात जळगाव ग्रामीण, भुसावळ, मुक्ताईनगर अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, एरंडोल-पारोळा, चोपडा या मतदार संघातून तयारीला लागण्याचे संकेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना असल्याचे सांगितले जाते. रावेर लोकसभा मतदार संघ कॉँग्रेसकडे दिल्यानंतर अमळनेर व जामनेर हे दोन मतदार संघ राष्टÑवादीकडे देण्याचे ठरल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाध्यक्षांच्या राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे
जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुंबईतील बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. हा राजीनामा आपण स्वत:हून दिला असल्याचे त्यांनी सांगून याप्रश्नी काय निर्णय घ्यायचा तो प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेते घेतील असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर अॅड. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
मुंबईतील बैठकीनंतर गती
पक्षाकडून देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे जिल्हा पातळीवर पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी २५ ते १ जुलै या कालावधीत इच्छूकांकडून आॅन लाईन व आॅफ लाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जात आहेत. इच्छुकांकडून खुला प्रवर्गातील इच्छूक उमेदवार असल्यास पाच हजार व राखीव तसेच महिलांसाठी अडिच हजाराचा पक्ष निधी स्विकारला जात आहे. दाखल अर्जांनी ३ जुलैला मुंबईत छाननी होणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्यांदाच कोणताही गाजावाजा न करता पक्षाकडून ही प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.