तमाशाच्या फडात नाचणारा सहायक फौजदार निलंबित; दुसराही रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:19 AM2022-09-19T06:19:17+5:302022-09-19T06:20:02+5:30
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे तमाशाच्या फडात नाचणारा सहायक फौजदार भटू वीरभान नेरकर याला शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले आहे. याच प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याचा आणखी एक कर्मचारी रडारवर असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मुंढे यांनी ‘लोकमत’ला दिली.
गेल्या महिन्यात निवृत्ती नगरात भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे, ता. जळगाव) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (२२, रा.आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली आहे. या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याच्या गावात तमाशाचे आयोजन केले होते. तेथे भटू नेरकर याच्यासह एका कर्मचाऱ्याने हजेरी लावली होती. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचा आरोप झाला होता.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य आढळल्याने एकाला निलंबित करण्यात आले आहे. दुसऱ्याचा नेमका काय सहभाग आहे, त्याची चौकशी सुरु आहे. तथ्य आढळल्यास त्याच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाईल.
- डॉ. प्रवीण मुंढे,
पोलीस अधीक्षक, जळगाव