निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:25 PM2019-07-15T14:25:30+5:302019-07-15T14:27:55+5:30

सुविधांची बोंबाबोंब : वर्षभरात शहराचा चेहराही तोच, समस्याही तीच, विकासाच्या स्वप्नांची राखरांगोळी ‘याची देही’ पाहण्याचे दुर्भाग्य

Assurances of assurances by elected representatives | निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची खैरात

निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची खैरात

Next


जळगाव : विकासाच्या नावावर मते मागत वर्षभरात जळगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलवण्याची भाषा करणाऱ्यांनीही जळगावकरांची निराशा केली आहे. विकास तर दूरच आहे, परंतु पार शहराची दूरवस्था करुन टाकली आहे. रस्त्यांवर तयार झालेल्या खड्डयांमध्ये सर्वसामान्य निष्पाप जळगावकरांचा बळी जात असून देखील निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींकडून केवळ खोट्या आश्वासनांची खैरात केली जात आहे. विकासाच्या स्वप्नांची अक्षरश: राखरांगोळी नागरिक ‘याची देही याची डोळा’ पाहू लागले आहेत.
वर्षभरापूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत शिवसेना व भाजपाच्या नेत्यांकडून केवळ विकासाच्या नावावर मते मागण्यात आली. जळगावकरांनीही विकासाच्या नावावर भाजपाला पहिल्यांदाच मनपाचे दार उघडून देत सत्तेच्या चाब्या दिल्या. आतापर्यंतच्या १० महिन्याचा काळात एकही ठोस काम सत्ताधाऱ्यांना करता आलेले नाही. रस्त्यांचा दुरावस्थेमुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीतच घेवून वाहने चालवावी लागत आहेत. आता केवळ महामार्गच नाही तर शहरातील एखादा चौक किंवा उपनगरातील रस्ताही वाहनधारकांच्या जीवावर उठलेला दिसून येत आहे.
राखून ठेवला १०० कोटींचा निधी ?
शहराच्या विकासासाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी शासनाने नगरोथ्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. निधी जाहीर होवून आता ११ महिन्यांचा काळ लोटला. पण हा निधी अजून प्रशासकीय प्रक्रियेतच अडकला आहे.
अनिल बोरोले यांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार व अधिका-यांवर गुन्हे दाखल करा
उद्योजक अनिल बोरोले यांचा शुक्रवारी सायंकाळी शहरातील खड्डयामुळे अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघातास रस्ता तयार करणारे ठेकेदार व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांकडे एका पत्राद्वारे केली आहे. गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई पोलीस अधिनियमातील फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४९, १५० व १५१ नुसार पोलिसांनीच स्वत:हून अशा घटनांमध्ये पुढाकार घेऊन फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करण्याचा नियम आहे. चित्रा चौकातील अपघात प्रकरणी अधिकारी व ठेकेदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची विनंती गुप्ता यांनी केली आहे.
विश्वासाला मिळाले धूळ, चिखल अन् खड्डयांची भेट
जळगावकरांनी दाखवलेल्या प्रेमाचा ‘विश्वासघात ’लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. १० महिन्यात जळगावकरांच्या नशिबी धूळ, चिखल, कच-याचे ढीग अन् रस्त्यांमधील जीवघेणे खड्डे अशीच भेट या निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींनी दिली आहे. अमृत योजना नागरिकांसाठी फायद्याची असली तरी मक्तेदाराचे दुर्लक्ष व प्रशासनाच्या बेफीकरीमुळे ती जळगावकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. निविदेत निश्चित केल्यानुसार मक्तेदारानी खड्डे खोदल्यानंतर ते खड्डे डांबरने दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र, तसे होताना दिसून येत नसून मक्तेदारावर सत्ताधारी किंवा प्रशासनाचेही कुठलेही लक्ष दिसून येत नाही.

Web Title: Assurances of assurances by elected representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.