अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर फेकले सिलिंडर, महिलेने घेतला चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 10:42 AM2022-04-01T10:42:39+5:302022-04-01T10:44:04+5:30
Crime News : दीड वाजता पथक त्याच्या घरी जिन्यावरुन चढत असताना कुत्रा भुंकायला लागला, त्यामुळे पोलीस आल्याचे चाहूल लागताच डबल याने गच्चीवर जाऊन तेथून शेजारी राहणाऱ्या अफरस बेग नूर बेग उर्फ कालू याच्या घरात घुसला. पोलीस तेथे पोहचताच दुसऱ्या घरात शिरला.
जळगाव : प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगाराने अटक करायला गेलेल्या पोलिसांच्या अंगावर रेग्युलेटर काढून भरलेले गॅस सिलिंडर फेकले तर त्याच्या आईने झटापटीत चावा घेतल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास गेंदालाल मील भागात घडली. यात शहर पोलीस ठाण्याचे अमलदार प्रफुल्ल धांडे जखमी झाले असून जुबेर उर्फ डबल भिकन शेख (वय २५) याच्यासह त्याची आई मुमताजबी व भाऊ फारुख (सर्व रा. गेंदालाल मील) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्यात जुबेर उर्फ डबल भिकन शेख हा फरार होता. त्याशिवाय आणखी एक दुसरा गुन्हा दाखल असल्याने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी बुधवारी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पथकाला डबलसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा त्यांच्या घरी शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, तेजस मराठे, योगेश इंधाटे, प्रणेश ठाकूर, रतन गिते, कमलेश पाटील आदी जण गेंदालाल मील भागात गेले असता डबल घरी असल्याची माहिती मिळाली. दीड वाजता पथक त्याच्या घरी जिन्यावरुन चढत असताना कुत्रा भुंकायला लागला, त्यामुळे पोलीस आल्याचे चाहूल लागताच डबल याने गच्चीवर जाऊन तेथून शेजारी राहणाऱ्या अफरस बेग नूर बेग उर्फ कालू याच्या घरात घुसला. पोलीस तेथे पोहचताच दुसऱ्या घरात शिरला.
...तर स्वत:ला मारुन टाकेन
पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता डबल याने लोखंडी सळई घेत स्वत:च्या डोक्यावर व हातावर मारुन दुखापत करुन घेत ‘ तुम्ही माझ्याजवळ आले तर मी स्वत:ला मारुन टाकेन ’ अशी धमकी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीस तेथून माघारी फिरुन खाली आडोशाला थांबले. थोड्या वेळाने पोलिसांना पाहून त्याने घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले, रेग्युलेटर काढून ते वरुनच पोलिसांच्या अंगावर फेकले. दैव बलत्तर म्हणून सिलिंडर फुटले नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.