तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार; तरुणाला मरेपर्यंत जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:28 AM2021-02-18T04:28:49+5:302021-02-18T04:28:49+5:30
जळगाव न्यायालयाचा निकाल : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने केले कृत्य जळगाव : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तीन वर्षाच्या मुलीवर ...
जळगाव न्यायालयाचा निकाल : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने केले कृत्य
जळगाव : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या किशोर ऊर्फ पिंटू निंबा भोई (वय ३८, रा. बेडरपुरा, नगरदेवळा, ता. पाचोरा) याला सत्र न्यायालयाने बुधवारी मरेपर्यंत जन्मठेप व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी हा निकाल दिला.
या घटनेबाबत माहिती अशी की, २६ मार्च २०१९ रोजी दुपारी दोन वाजता पीडित बालिका गल्लीत खेळत होती, तर तिची आई घरात काम करीत होती. त्यावेळी किशोर भोई याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पीडितेला घरात बोलावून अत्याचार केला. याचवेळी पीडितेचा रडण्याचा आवाज आल्याने तिची आई धावून आली असता, किशोर याच्या घराचा दरवाजा बंद होता. आवाज देऊनही तो दरवाजा उघडत नव्हता. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन आवाज दिला असता, त्याने अर्धनग्न अवस्थेत दरवाजा उघडून तेथून पळ काढला. पीडित बालिकेने आईजवळ घटनाक्रम कथन केला. त्यानंतर आईने त्याच स्थितीत पाचोरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरून कलम ३५४ अ व ३७६ तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम १२ चे कलम ३,४,५ एम ६,७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितेची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण
हा खटला सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात चालला. सरकारतर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्यानंतर ३ वर्षे वयाच्या चिमुरडीसोबत झालेले कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे असेच आहे, त्यामुळे समाजातील अशा प्रवृत्ती ठेचण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, असा प्रभावी युक्तिवाद करून काही पुरावे न्यायालयासमोर सादर केले. यात पीडितेची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यामुळे न्यायालयाने ३७६ अ व ३७६ ब अन्वये किशोर भोई याला दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी देविदास कोळी यांची या खटल्यात मोलाची मदत झाली.
--