पहूर येथील विवाहितेवर दोघांकडून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:35 PM2019-10-11T18:35:17+5:302019-10-11T18:35:46+5:30
अपहरण करून नेले जंगलात : पिंपळगाव हरेश्वर येथून सुटका
पहूर, ता.जामनेर : येथील पाचोरा रोडलगत असलेल्या खडीमशीन या नवीन वसाहतीमध्ये राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजातील २० वर्षीय विवाहितेचे गुरुवारी सकाळी दोघांनी भरदिवसा अपहरण करून जंगलात नेऊन अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून पीडितेची रात्री सुटका केली असून याप्रकरणी पहूर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाचोरा रोडवरील वीज उपकेंद्रासमोर खडीमशीन नवीन वसाहतीत भिक्षा मागून पोटभरणारे आदिवासी पारधी समाजाची काही कुटुंबे आहेत. यातील मोनाली (नाव बदललेले) ही २० वर्षीय विवाहिता दोन लहान भावडांसह पहूर गावात भिक्षा मागण्यासाठी सकाळी सात वाजता घराबाहेर पडली. भिक्षा आटोपल्यावर ती घराकडे साडेआठच्या सुमारास परतली. यादरम्यान पाचोरा रोडवर मागून रिक्षात आलेल्या गौरव राजू कुमावत रा.खडी मशीन व भिका फकिरा तडवी रा.सांगवी या दोघांनी तिला रिक्षात ओढले व मारहाण केली. त्या दोघांनी तिचे तोंड व हातपाय बाधले. रिक्षाचालक कैलास घोंगडे याला चाकूचा धाक दाखवून आम्ही सांगतो तिकडे चल म्हणून वाकोदजवळील एका पेट्रोलपंपावर रिक्षा थांबविली. त्या ठिकाणी हुसेन जबीर तडवी रा.खडी मशीन हा दुचाकी घेऊन आला. मात्र प्रकरण वेगळेच असल्याचा संशय कैलास व हुसेन यांना आल्याने त्यांनी वाकोद येथून माघार घेतली. तेथून भिका व गौरव यांनी दुचाकीवर मोनालीला भारूडखेड्याच्या जंगलात नेऊन तिच्यावर एका झोपडीत सामूहिक अत्याचार केला.
लहान मुलांकडून घटना उघडकीस
मोनालीसोबत असलेल्या दोन लहान मुलांनी तिला पळविल्याचे घरी सांगितल्यावर तिचा शोध घेण्यात आला. गुरवारी दुपारी दोन वाजेनंतर दोन पोलीस व मोनालीचे काका यांनी पाचोरा येथे जाऊन शोध घेतला. मात्र तपास लागला नाही. घटनेने नातेवाईक सैरभैर झाले होते.
पिंपळगाव हरेश्वर येथून रात्री सुटका
मोनाली ही अत्याचार करून हातपाय व तोंड बांधलेल्या अवस्थेत पिंपळगाव येथील काही महिलांना दिसली. त्यांनी विचारपूस करून तिची सुटका केली. तिच्या काकांचा माबाईल नंबर घेऊन महिलांनी संपर्क साधला असता नातेवाईकांनी तिला ताब्यात घेऊन गुरुवारी रात्री दहा वाजता पहूर येथील घरी आणले. पीडितेने संपूर्ण प्रकार घरी सांगितला. शुक्रवारी सकाळी याबाबत पहूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली.
पोलीसांकडून दोघांविरुद्ध कारवाई
पीडितेच्या फिर्यादीवरून गौरव राजू कुमावत (रा.खडी मशीन, पहूर) व भिका फकीरा तडवी (रा.सांगवी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत.