जळगावात मद्यपी दुचाकीस्वाराची एस.टी.वर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:27 PM2018-04-27T12:27:10+5:302018-04-27T12:27:10+5:30
महामार्गावरील घटना
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - अपघात होण्यापासून वाचविणाऱ्या एस.टी. चालकालाच दुचाकीस्वाराने मारहाण केली व त्यानंतर केलेल्या बसवर केलेल्या दगडफेकीत वाहक दीपक रामकृष्ण बडगुजर (वय ४० रा.भुसावळ) यांच्या नाकावर दगड लागल्याने ते जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता महामार्गावर खेडी पेट्रोल पंपासमोर घडली. या घटनेनंतर दुचाकीस्वार पसार झाला आहे.
चालकाला कॅबीनमधून बाहेर काढून मारहाण
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ आगाराची भुसावळ-सुरत ही एस.टी.बस (क्र.एम.एच.२० बी.एल.३७३६) जळगावकडे येत असताना साडे पाच वाजेच्या सुमारास खेडी पेट्रोल पंपाजवळ भुसावळकडे जाणारा दुचाकीस्वार (क्र.एम.एच.१९ सी.क्यु.०६९४) अचानक बसच्या पुढे आला. त्याला वाचविताना चालक अनिल उत्तम पाटील यांनी अचानक ब्रेक दाबून बस जागेवर थांबविली. त्यात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला कोसळला. त्यामुळे दुचाकीस्वाराने चालकाला कॅबीनमधून बाहेर काढून मारहाण केली.
मद्यपी दुचाकीस्वाराची एस.टी.वर दगडफेक
त्यानंतर रस्त्यावरील दगड उचलून बसवर फेकले. त्यातील एक दगड वाहक दीपक बडगुजर यांच्या नाकाला लागला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने याच बसमधून प्रवास करणारे महामंडळाचे कर्मचारी भगवान फकिरा ठाकूर (रा.साकेगाव, ता.भुसावळ) यांनी त्यांना रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
एक हजार रुपये काढून नेल्याचा आरोप
दुचाकीस्वाराने झटापटीच्या वेळी वाहकाच्या शर्टाच्या खिशात ठेवलेले एक हजार रुपये काढून नेल्याचा आरोप चालक अनिल पाटील यांनी केला.
या बसमध्ये ३९ प्रवाशी होते. तिकिटावरुन त्याचा हिशेब केला असता त्यातही एक हजार रुपये कमी भरले. दरम्यान, या घटनेमुळे बसला दीड तास उशिर झाला. वृध्द व महिला प्रवाशांचे हाल झाले.
बस नेली पोलीस ठाण्यात
या घटनेनंतर दुचाकीस्वार दुचाकी सोडून पळून गेला. थोड्या वेळाने चार ते पाच तरुण घेऊन येत दुचाकीही घेऊन गेला. दरम्यान, याच बसमधून प्रवास करणाºया परेल, मुंबई आगाराच्या वाहक शीतल मारुती कापसे यांच्याशीही दुचाकीस्वाराने हुज्जत घातली, याची खुद्द माहिती कापसे यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, प्रवाशी खेडी थांब्यावर उतरवून बस एमआयडीसी पोलीस स्टेशनला नेण्यात आली.