चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे पुजारी व ग्रामस्थांमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:07 AM2020-01-19T00:07:29+5:302020-01-19T00:08:30+5:30
पाटणादेवी येथे देवीच्या पुजेच्या मालकीवरून पुजारी व ग्रामस्थांमध्ये सुरू असलेल्या वादाला हाणामारीने तोंड फुटले आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : पाटणादेवी येथे देवीच्या पुजेच्या मालकीवरून पुजारी व ग्रामस्थांमध्ये सुरू असलेल्या वादाला हाणामारीने तोंड फुटले आहे. शुक्रवारी हा वाद विकोपाला गेल्याने परस्परांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मंदिराचे पुजारी बाळकृष्ण जोशी हे न्यायालयात गेले. न्यायालयात त्यांच्या बाजुने निकाल लागल्याचे बोलले जाते. त्यातून पुजारी आणि ग्रामस्थांमधील वाद शमवण्याऐवजी तो हाणामारीपर्यंत पोहचल्याचे समोर आले आहे. पुजारी आणि गावकरी यांनी एकमेकांवर हाणामारीचे आरोप केले असून दोन्ही गटांकडून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला परस्परांविरोधात दिलेल्या फिर्यादेवरून गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पाटणादेवी मंदिराचे पुजारी मनोज बाळकृष्ण जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाटणादेवी मंदिरावरील पूजाअर्चा करणे तसेच दानपेटी व त्यातील उपहारासंदर्भात दाखल असलेल्या तक्रारी अर्जाचा निकाल आमच्या बाजुने लागल्याने आरोपींंना वाईट वाटल्याच्या कारणावरून शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता चंडिकावाडी गावाजवळ रस्त्यावर व पाटणादेवी येथे आरोपींनी गैरकायदा मंडळी जमवून हातात दगड विटा घेऊन मनोज जोशी यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीस (एमएच-१९-सीयू-९२५७) अडवून फिर्यादी जोशी यांचे डोके गाडीच्या काचेवर आदळले व एकाने गळा दाबून चापटा बु्क्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचे वडील बाळकृष्ण जोशी व भाऊ कमलेश जोशी यांनादेखील मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच वाहनावर दगडफेक करून नुकसान केले. या झटापटीत गळ्यातील चैन व चीजवस्तूंचे नुकसान केले.
याप्रकरणी सतीश निकम, बबली निकम, नितीन बोडखे, अशोक सोनवणे, योगेश काळे, पंकज काळे, भाऊसाहेब ठाकरे, विलास सोनवणे, विजय बिडवे व शब्बीर शेख सर्व रा.पाटणादेवी यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर करीत आहेत.
दरम्यान, राहुल भीमराव निकम रा.पाटणादेवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पाटणादेवी बस स्टँडजवळ काहीएक कारण नसताना मारूती कारचालक मनोज पूर्ण नाव गाव माहीत नाही. याने पाटणादेवीकडून येवून चारचाकी गाडी जोरात चालवून राहुल निकम यांना समोरून धडक दिली. त्यात राहुल निकम हा जमिनीवर फेकला गेला. त्यास छातीवर, डोळ्यावर व मानेवर मार लागला. राहूल यास धडक देणाऱ्या गाडीचा क्रमांक माहीत नव्हता. मात्र गावातील लोकांनी सदर गाडी मनोज ब्राम्हण याची होती. याप्रकरणी जखमी राहुल निकम याने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार किशोर सोनवणे करीत आहेत.