जळगावात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:12 PM2019-08-08T13:12:42+5:302019-08-08T13:13:20+5:30

बाजार समितीत वर्चस्वाचा वाद

Attack on BJP corporator's husband in Jalgaon | जळगावात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

जळगावात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

googlenewsNext

जळगाव : भाजप नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती भाजप नेते धुडकू सपकाळे (रा.सिध्दीविनायक शाळेजवळ, अयोध्या नगर) यांच्यासह गजानन आनंदराव देशमुख (५४, रा.अयोध्या नगर) या दोघांवर कारमधून आलेल्या चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. बुधवारी दुपारी दीड वाजता एमआयडीसी रस्त्यावरील राका चौकात ही घटना घडली. यात दोघे जण जखमी झाले आहेत. बाजार समितीत आपलेच हमाल पुरविण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
हल्लेखोरांनी तलवार क्रिकेटच्या स्टम्पचा वापर केला. सपकाळे यांना खासगी तर देशमुख यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळे व देशमुख हे कृषी बाजार समितीतून राका चौकाकडे जात असताना एका टपरीवर थांबले. तेथे ते संजय चव्हाण यांच्याशी गप्पा मारत असताना एका कारमधून आलेल्या (क्र.एम.एच.१९ बी.जे.१५७) चौघांनी खाली उतरुन सपकाळे व देशमुख यांच्यावर हल्ला चढविला. यापैकी नितीन याने सपकाळे यांच्यावर धारदार शस्त्राने तर अन्य लोकांनी देशमुख यांच्यावर क्रिकेटच्या दांड्याने हल्ला केला. सपकाळे यांनी हातावर तलवार झेलल्याने प्राण वाचले. देशमुख यांच्या डोक्यात दांडा मारण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जि.प.सदस्य पल्लवी देशमुख यांचे पती रवी देशमुख (रा.असोदा) यांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. हल्ला करणाऱ्यांमध्ये नितीन सोनवणे, कॉमेश सपकाळे, मयुर सपकाळे व भुरा कोळी यांची नावे पुढे आली आहेत. दरम्यान, डोक्याला मार लागल्यामुळे देशमुख यांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, आमदार सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह मनपाचे इतर नगरसेवक व विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
संघटनेचे कामबंद आंदोलन
या हल्लयाच्या निषेधार्थ तसेच हल्लेखोरांच्या अटकेसाठी फळे व भाजीपाला हमाल-महिला जनरल कामगार संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले. रमेश बिºहाडे, संजय बोरसे, नितीन पाटील यांच्यासह ३३ जणांनी सभापतींना निवेदन सादर केले.
हल्लेखोरांना अटक करा
या घटनेनंतर आरपीयआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची भेट घेतली. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी व या घटनेमागे नेमके कारण काय आहे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे अडकमोल यांनी सांगितले. बहुजन क्रांती मोर्चाचे मुकूंदा सपकाळे यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे. आरपीयआय खरात गटाचे अध्यक्ष जे.डी.भालेराव यांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाच जणांविरुद्ध रात्री ११.३० वाजता दाखल झाला गुन्हा
कॉमेश सपकाळे, मयूर इंद्रराज सपकाळे, नितीन प्रकाश सोनवणे, मनोज प्रकाश सोनवणे व कार चालक भुरा उर्फ विजय सपकाळे या पाच जणांविरुद्ध बुधवारी रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तासाभरानंतर नितीन सोनवणे व कॉमेश सपकाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्याच्या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, उपनिरीक्षक विशाल वाठारे, सहायक फौजदार अतुल वंजारी, गोविंदा पाटील व सहकाºयांनी तत्काळ घटनास्थळ व जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जखमींकडून घटनेची माहिती जाणून घेतली.
दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
धुडकू सपकाळे व हल्लयातील मुख्य सूत्रधार नितीन सोनवणे या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. नितीन याचा मेहुणा कारागृहात खूनाची शिक्षा भोगत आहे तर धुडकू यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. बाजार समितीत पंधरा दिवसापूर्वी झालेल्या वादाच्यावेळीच भविष्यात दोघांमध्ये मोठा वाद उफाळून येईल, असे संकेत मिळाले होते, मात्र पोलीस यंत्रणा गाफिल राहिली. तेव्हाच गुन्हा दाखल केला असता तर आज ही वेळ आली नसती.
महिनाभरापूर्वी झाला होता वाद
धुडकू सपकाळे हे बाजार समितीत हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे समितीत सपकाळे यांचेच हमाल असून आता भविष्यात आपलेच हमाल व वर्चस्व असावे यावरुन नितीन प्रकाश सोनवणे (३०, रा.अयोध्या नगर) यांच्याशी वाद होता.महिनाभरापूर्वी हमाल पुरविण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. तेव्हा सपकाळे यांनी नितीनला मारहाण केली होती, पोलिसात प्रकरण जावूनही आपसात तडजोड झाल्याने तेव्हा गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Attack on BJP corporator's husband in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव