लष्करी अळीचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:44 PM2019-07-29T14:44:11+5:302019-07-29T18:06:06+5:30
पहूर परिसरात चिंता : मका उत्पन्नात येणार कमालीची घट
पहूर, ता. जामनेर : सुलतानी व अस्मानी संकटाच्या चक्रात दरवर्षी शेतकरी सापडत आला असून यंदा मका पिकावर पहूर सह परीसरात लष्करी अळीचे आक्रमण झाल्याने मका उत्पादक शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मका उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.
पहूर सह परीसरात तीन हजार ६०० हेक्टर जमिनीवर खरीपात मका पिकाची लागवड यंदा झाली आहे. मात्र यंदा या पिकावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने मका पिकाला अळीपासून वाचविण्यासाठी बळीराजा महागडी किटकनाशके फवारणी करताना दिसत आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर मका पिकाला ही अळी चाळणी करून ठेवते त्यामुळे मका पिकांचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना जिकरीचे होणार आहे. या लष्करी अळीने नाशिक जिल्ह्यात थैमान घातल्याने शेतकऱ्यांना मका पिकावर नांगर चालविण्याचे संकट ओढवले आहे. मका पीक नगदी असून चांगला भाव गेल्यावर्षी पासून मक्याला मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांची मका पिकाकडे ओढ दिसून येत आहे.
कृषी विभाकडून उपाययोजना
मका पिकाला लष्करी अळी पासून वाचवण्यासाठी कृषी विभाग परीसरात शेतकºयांना मार्गदर्शन करून ग्रामपंचायत मध्ये लष्करी अळीचे भित्ती पत्रके लावली जात आहे.
अर्ध्या किमंतीत किटकनाशके दिली जात असून कृषी सहायकांडून याचे सर्वेक्षण करून आठवड्यातून दोन वेळा कृषी आयुक्त कार्यालयाला अहवाल आॅनलाईन पाठविला जात आहे. काही शेतांमध्ये अळी खाण्यासाठी पक्षांना बसण्याकरीता बांबू लावण्यात येत आहे. शेती शाळा दहा ते पंधरा शेतकºयांची घेण्यात येऊन प्रत्यक्ष शेतांवर अधिकारीजात आहेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी एम. जी.जंगम यांनी केले आहे.
मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. यामुळे खर्चात वाढ झाली असून उत्पन्नात घट येणार आहे. शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
-शैलैश कृष्णा पाटील, शेतकरी पहूर पेठ
मका पिकाच्या पोंग्यात राख मिश्रित घेसु वाळू किंवा कार्बोफिराँनचा वापर करावा. अमावास्याला अळी अंडी घालते त्यामुळे अमावस्या झाल्यावर दोन तीन दिवसांत पंधराशे पी.पी. एम. निंबोळी अर्क फवारणी करावी व तेथून पाच ते सहा दिवसांनी किटकनाशकाची फवारणी करावी. यामुळे किड नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल. पोंग्यात किंवा मक्याच्या पानांवर विष्टा आढळून आल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षणे समजावे. निश्चित या किडीमुळे मक्याच्या उत्पन्नात घट येणार आहे.
-बी.एम.शिंपी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव