जळगावात मराठा आरक्षणासाठी टायर जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:15 PM2018-07-26T12:15:52+5:302018-07-26T12:17:08+5:30
मानराज पार्कजवळील घटना
जळगाव : मराठा आरक्षणासाठी शहरातील महामार्गावरील मानराज पार्कजवळ बुधवारी दुपारी साडे तीन वाजता एका तरुणाने टायर जाळण्याचा प्रयत्न केला, त्याला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले. राहूल सुदाम पाटील (वय २४, रा. ओमशांती नगर, पिंप्राळा, जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे बंदची हाक देण्यात आल्यानंतर शहरात मंगळवारी शांततेत बंद पाळण्यात आला. बुधवारी दुपारी साडे तीन वाजता राहूल पाटील या तरुणाने मानराज पार्कजवळ महामार्गावर कारचे तीन टायर आणले. ते पेटविण्याचा प्रयत्न केला. हा आंदोलनाचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर काही जणांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला फोनवरुन ही माहिती दिली. पोलिसांनी तातडीने महामार्ग गाठून राहूल याला ताब्यात घेतले. महामार्गावर ठेवलेले कारचे तीन टायरही पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने टायर जाळण्याचा प्रयत्न असफल झाला. दरम्यान, राहूल याच्यासोबत आणखी दोन जण होते, मात्र पोलीस आल्याचे लक्षात येताच या दोन्ही तरुणांनी धूम ठोकली. दरम्यान, घटनास्थळावर फक्त एकच तरुण आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोंधळ घातल्याचा गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी राहूल पाटील या तरुणाची चौकशी केली असता समाजासाठी आपण हे आंदोलन करीत असल्याचे त्याने स्पष्ट केले. राहूल अविवाहित असून त्याचे शिक्षण बी.कॉम झालेले आहे, तो एका कंपनीत नोकरीला आहे. पोलिसांनी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केली. त्यानंतर सायंकाळी मद्यप्राशन करुन गोंधळ घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहूल याने मद्य प्राशन केल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाल्याची माहिती निरीक्षक रोहम यांनी ‘लोकमत’ ला दिली.