बीएचआरच्या नावाखाली बहुजन लोकप्रतिनिधींना संपविण्याचा प्रयत्न - आमदार मंगेश चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:19 AM2021-08-15T04:19:30+5:302021-08-15T04:19:30+5:30
जळगाव : बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश ...
जळगाव : बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी जळगावात केला. बीएचआर या गोंडस नावाखाली राजकीय सुपारी घेऊन तसेच सरकारी यंत्रणेला हाताशी धरत बहुजन लोकप्रतिनिधींना संपविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाच्या सुनावणीवेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा उल्लेख समोर आल्यानंतर या विषयी आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वरील दावा करीत संबंधितांवर आपण अब्रूनुकसानाचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले. २०१२ मध्ये मी बीएचआर पतसंस्थेतून कर्ज घेतले व ते २०१४ मध्येच कोणतीही तडजोड न करता पूर्ण कर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती मी मागविली असून ती पूर्ण मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर विधीमंडळात सादर करणार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.