पगार मिळत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:16+5:302021-02-24T04:17:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पगार थकले आहे. त्यामुळे कर्मचारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पगार थकले आहे. त्यामुळे कर्मचारी उदरनिर्वाह करणार कसा? असा प्रश्न उपस्थित करीत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात पगार द्या पगार द्या अन्यथा काम बंद करू अशी घोषणा देत ग्रामविकास अधिकाऱ्यांना जाब विचारत घेराव घातला. यात एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला.
कोटींचे उत्पन्न असलेल्या नशिराबाद ग्रामपंचायतींचा कारभार वसुली अभावी ठप्प होत आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.
संतप्त कर्मचारी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात आले. फक्त कामेच करायची का? पगार देणार केव्हा? असा सवाल करीत विनोद प्रेमचंद चिरावंडे यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले. या वेळी अन्य कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रसंगी विकास वाघुळदे,भास्कर माळी, सुनील पाटील, जयेश मर्दाने, उखर्डू बि-हाडे, अमोल राजपूत, अशोक कावळे, कमलाकर रोटे, बळीराम बोंडे, दुर्गादास माळी, सुरेश कावळे, संतोष रगडे, पराग ब-हाटे यांच्यासह असंख्य महिला व पुरुष ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद रंधे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून समजूत काढली. मात्र कर्मचाऱ्यांनी पगार द्या, आता आश्वासने नको अशी मागणी केली.
अधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देत संप
१६ जानेवारी रोजी थकीत पगार मिळण्याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत त्याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. थकीत पगारासाठी वारंवार व लेखी अर्ज देऊन सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप कर्मचाऱ्यांनी निवेदनात केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत, नशिराबाद पोलीस स्टेशन येथे याबाबत निवेदन देण्यात आले असून स्वच्छता, पाणीपुरवठासह कार्यालयीन कर्मचारी असे कायमस्वरूपी ३९ व रोजंदारीवरील ४८ अशा एकूण ८७ कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काम बंद केले आहे.
घरात मंगल कार्य, हाती पैसा नाही काय करावे
काम करून सुद्धा पगार मिळत नाही ही विवंचना आहे. कुटुंबात दोन दिवसांवर मंगल कार्य येवून ठेपले आहे. त्यामुळे पैशाची नितांत गरज असून वारंवार मागणी करुनसुद्धा पगार मिळत नसल्याची कैफियत एका कर्मचाऱ्याने यावेळी मांडली.
वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक समस्या आहे. त्यात गावाचा कारभार, दैनंदिन कामे मोठ्या प्रमाणावर असतात. त्यातच कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहे. एक ते दोन पगार देण्यासाठी काहीतरी तोडगा काढू, कर्मचाऱ्यांनीही सहकार्य करावे, आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये.
बी.एस. पाटील, ग्रामविकास अधिकारी, नशिराबाद