मुलाचा जन्मदात्या आईला ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 10:18 PM2021-05-15T22:18:01+5:302021-05-15T22:21:29+5:30
मुलाने दारूच्या नशेत पॉलिथीन प्लॅस्टिकच्या पिशव्यांची होळी करून पॉलिथीनचा पेटता गोळा थेट जन्मदात्या आईच्या अंगावर फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोरगाव खु।। येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : दारूच्या व्यसनाधीनतेमुळे पत्नी व मुलाने त्याग केल्याने संसाराचे वाटोळे झालेल्या वृध्दाश्रमाच्या उंबरठ्यावरील मुलाने दारूच्या नशेत पॉलिथीन प्लॅस्टिकच्या पिशव्यांची होळी करून पॉलिथीनचा पेटता गोळा थेट जन्मदात्या आईच्या अंगावर फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील मोरगाव खु।। येथे घडली. आपली जन्मदात्री आई शेत नावावर करून देत नाही व इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनचे पेन्शन तथा दारू पिण्यासाठी पैसे देत नाही. म्हणून ‘त्या’ मुलाने दारूच्या नशेत माणुसकीला काळीमा फासला आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोरगाव खु।। येथील नवल पांडुरंग पाटील (५८) याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी व मुलगा कंटाळून माहेरी निघून गेले आहेत. त्याची वृध्द आई सुगंताबाई पांडुरंग पाटील (८४) ही शुक्रवारी रात्री आपल्या घरात झोपली असताना शेती विकून पैसे देत नाही, शेत नावावर करून देत नाही व इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे पेन्शन नावावर करून देत नाही, म्हणून मुलगा नवल पांडुरंग पाटील (५८) याने दारूच्या नशेत जन्मदात्या आईला शिवीगाळ व मारझोड केली.
एवढेच नाही तर, पॉलिथीनच्या पिशव्यांची होळी करून प्लॅस्टिकचा पेटता गोळा बाजेवर झोपलेल्या जन्मदात्या आईच्या अंगावर पाठीमागे फेकून जिवंंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साडी व परकर पेटल्याने वृृध्द आईने घराबाहेर पळ काढून बचावासाठी टाहो फोडल्याने शेजारच्या लोकांनी धाव घेऊन तिला विझवले. ही घटना वृृध्द महिलेच्या घरात शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
जखमी वृध्देला तिच्या आप्तेष्टांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी त्यांचेवर औषधोपचार करून रावेर पोलिसात खबर दिली. दरम्यान, ठाणे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र राठोड यांनी वृध्देच्या जबाबावरून फिर्याद नोंदवून रावेर पोलिसात भादंवि कलम ३०७, ३३६, ४३६, ३२३, ५०४ अन्वये आरोपी मुलगा नवल पांडुरंग पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे मार्गदर्शनाखाली फौजदार मनोहर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.