बियाणे उत्पादन करून शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:31+5:302021-07-01T04:12:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : एकीकडे शेती परवडत नाही, कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, तालुक्यातील हिंगोणे खुर्द ...

Attempt to prevent farmer suicide by producing seeds | बियाणे उत्पादन करून शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न

बियाणे उत्पादन करून शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : एकीकडे शेती परवडत नाही, कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, तालुक्यातील हिंगोणे खुर्द प्रगणे जळोद या लहानशा गावातील पदवीधर राजश्री पाटील या महिलेने शेती व्यवसायात प्रगती करून विक्रमी उत्पन्न घेतले. या व्यतिरिक्त अनुकूल वातावरण नसतानाही अनेक बियाण्याचे वाणही तयार करून स्वतःची कंपनी स्थापन करून कृषी क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.

हिंगोणे खुर्द प्र. जळोद येथील राजश्री राजेश पाटील या पदवीधर असून, लग्नानंतर अवघ्या चार वर्षांत त्यांचे पती राजेश भाईदास पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला होता. वडिलोपार्जित ५५ एकर शेती होती. सासू शेती व्यवसाय बघायच्या. मात्र, स्वतःच्या दुःखातून सांभाळून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था लावून राजश्री पाटील यांनी शेतीबाबत अनभिज्ञ असूनही २०१७ साली शेती करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे, त्यांनी या व्यवसायात यशस्वी होण्याचा निश्चय करून, कृषीविषयी मासिके, कृषी प्रदर्शनमधून माहिती जाणून घेतली. त्यांनतर, त्यांनी १२ एकरवर ऊस लावला, २० एकरमध्ये सुबाभूळ लावला, तर उर्वरित जमिनीत कांदा, कपाशी, भाजीपाला घेणे सुरू केले.

आधी ऊसाचे उत्पन्न एकरी २० ते २१ टन यायचे, परंतु राजश्री पाटील यांनी कृषिभूषण संजीव माने यांच्या कार्यशाळेतून उत्पन्न वाढीव कसे घ्यावे, खत, पाणी व्यवस्थापन याचे मार्गदर्शन घेऊन, त्या पद्धतीने नियोजन केले व नंतर एकरी ४२ टन असे उत्पन्न घेऊ लागल्या. उसासाठी फारशी अनुकूल परिस्थिती नसताना उत्पन्न वाढवून एकरी ७० टन उत्पन्न घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

या व्यतिरिक्त त्या कांदा, दुधी भोपळा, वाल, कारले, मूग, भरीताचे वांगे असे उत्पादनही घेतात. जातीने लक्ष घालून आंतरमशागत, अभ्यासपूर्ण नियोजनामुळे पिकाची गुणवत्ता चांगली आली. त्यांनी शेतकऱ्यांना स्वस्तात उत्कृष्ट बियाणे देण्याचा निर्णय घेतला.

कांदा म्हटला की, लासलगाव, पिंपळगाव, उमराने, नाशिक या भागात भरघोस पीक आणि विविध प्रकारचे बियाणे मिळते. मात्र, राजश्री पाटील यांनी बियाणे निर्मिती सुरू केली. कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगरच्या संकेतस्थळावर भेट देऊन कृषी मासिक येथून माहिती घेऊन राहुरी कृषी विद्यापीठ, जिल्हा बीज प्रमाणीकरणाकडे नोंदणी केली. फुले समर्थ व दमोता फुरसुंगी या उत्कृष्ट कांदा बियाण्याचे उत्पादन करून, परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी स्वस्तात बियाणे उपलब्ध केले.

दमोता सिड्स कंपनी स्थापन करून, त्या माध्यमातून कांदा फुले समर्थ, गहू फुले समाधान, बाजरी धनशक्ती, भोपळा सम्राट, वाल फुले गौरी, कारले फुले ग्रीन गोल्ड यांच्या बियाण्यांचे उत्पादन केले व संशोधित भाजीपाला वाणाचे काम सुरू आहे. पाण्याचा नियोजनबद्ध वापर, जमिनीची सुपीकता टिकवून सेंद्रिय खतांचा वापर करून, महिला असूनही राजश्री पाटील शेती व्यवसायात यशस्वी झाल्या आहेत. शेतकऱ्यांना वाजवी भावात चांगली व उत्कृष्ट बियाणे मिळाल्यास उत्पन्न चांगले येते. परिणामी, शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी त्यांनी विविध वाणाचे बीजोत्पादन करून कृषी व्यवसायात यशस्वी होऊन महिलांपुढे आदर्श घालून दिला आहे.

शेती सांभाळून त्यांनी सरपंच म्हणून गावचा कारभारही सांभाळणे सुरू केले आहे. त्या आमदार अनिल पाटील यांच्या भावजयी आहेत.

===Photopath===

300621\30jal_1_30062021_12.jpg~300621\30jal_2_30062021_12.jpg

===Caption===

सुशिक्षित पदवीधर असूनही सासूच्या मार्गदर्शनाने स्वतः शेतीत राबून विविध बियाण्यांच्या उत्पादन करणाऱ्या राजश्री पाटील. (छाया :अंबिका फोटो)~सुशिक्षित पदवीधर असूनही सासूच्या मार्गदर्शनाने स्वतः शेतीत राबून विविध बियाण्यांच्या उत्पादन करणाऱ्या राजश्री पाटील. (छाया :अंबिका फोटो)

Web Title: Attempt to prevent farmer suicide by producing seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.