चाळीसगावला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय देण्यासाठी प्रयत्नशील राहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:48 PM2018-08-26T14:48:07+5:302018-08-26T14:49:12+5:30
वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन : न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी केले अश्वासित
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव येथील वकील बांधवांसह न्यायदान क्षेत्राला सशक्त वारसा आहे. ज्याप्रमाणे वरिष्ठस्तर न्यायालय देण्यासाठी प्रयत्न केला, त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आवश्यक अटींची पूर्तता केल्यास यासाठीदेखील जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहील, असे अश्वासित करून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी न्यायदानाची प्रक्रिया जलद करण्यासाठी आवाहनही केले.
रविवारी सकाळी सव्वादहा वाजता न्यायमूर्ती गंगापूरवाला यांच्या हस्ते चाळीसगाव न्यायालयाच्या आवारात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व चाळीसगावचे भूमीपुत्र संगीतराव पाटील यांच्यासह जिल्हा न्यायाधिश गोविंदा सानप, चाळीसगावच्या नूतन वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश लक्ष्मीकांत पाढेन, चाळीसगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राहुल पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी वकील संघासह, न्यायालयीन कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना न्यायमूर्ती गंगापूरवाला म्हणाले, वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन झाल्याने संधी वाढणार आहे. येथील पक्षकार आणि वकीलवृंदास होणारा त्रासही थांबणार आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्यास चाळीसगाव येथेदेखील सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्यांनी मनोगतात न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्यासह ‘नो पेंडसी’ हे तत्त्व पाळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविकात अॅड. राहुल पाटील यांनी ३१ वर्षांपासून सुरू असलेला पाठपुरावा विशद केला. या वेळी माजी मंत्री एम.के. पाटील, आमदार उन्मेष पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उदेसिंग पवार, प्रदीप देशमुख, प्रा. साहेबराव घोडे, उपसभापती संजय पाटील, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, जळगाव, पाचोरा, भुसावळ, भडगाव येथील वकील व सरकारी वकील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन चाळीसगाव न्यायालयाच्या न्यायाधीश अनिता गिरडकर यांनी केले. आभार जिल्हा न्यायाधिश लाडेकर यांनी मानले.