महिलेला विक्री करण्याचा प्रयत्न सतर्कतेमुळे फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:55 AM2019-06-14T10:55:59+5:302019-06-14T10:59:03+5:30
दलाल महिलेसह एक ताब्यात : विक्री केलेल्या महिलेच्या अंगावरील दागिने विकले
जळगाव : मांसाहारी जेवणात काही तरी द्रव्य खायला घालून पतीने सोडलेल्या वाकडी, ता.जळगाव येथील एका विवाहितेला शिरपुर तालुक्यात विक्री करण्याचा प्रयत्न नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला. विशेष म्हणजे ज्या महिलेची विक्री करावयाची होती, तिच्या अंगावरील दागिने १५ हजारात विक्री करुन ही रक्कम दलाल महिलेनेच ठेवून घेतली. यापूर्वीदेखील असे प्रकार घडले असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडी, ता.जळगाव येथील विवाहितेला पतीने सोडून दिलेले आहे. तिला एक मुलगा आहे. रुदावली, ता.शिरपुर येथील जिभाऊ अंबरसिंग सोनवणे याच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. तो नवीन लग्नाच्या तयारीत होता.
म्हसावद येथील दलाल महिलेच्या माध्यमातून चिचखोपा, ता.जामनेर येथील महिलेने वाकडी, ता.जळगाव येथील विवाहितेला बुधवारी म्हसावद येथे माशांचे जेवण दिले.या जेवणात काही तरी द्रव्य मिश्रण करण्यात आले, त्यामुळे या महिलेची शुध्द हरपली. चिचखोपा येथील दलाल महिला या विवाहितेला घेऊन पाचोरा येथे पोहचली. तेथून धुळे गाठले. दलाल महिलेने जिभाऊ याला धुळे येथे बोलावले. तेथे त्याच्या ताब्यात विवाहितेला देण्यात आले. सायंकाळी तो रुदावली येथे पोहचला.
म्हसावद दूरक्षेत्रात पोचहला जमाव
घरातून महिला गायब होताच, ज्या महिलेवर संशय होता तिच्याविरोधात नातेवाईकांचा जमाव म्हसावद पोलीस दूरक्षेत्रात पोहचला. हवालदार बाळकृष्ण पाटील यांनी त्यांची हकीकत समजूत घेत हा प्रकार निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना सांंगितला. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता चिचखोपा येथील महिलेचा शोध घेतला असता ती पती संतोष श्यामराव सोनवणे याच्यासोबत तितूर, जि.औरंगाबाद येथे विवाह सोहळ्यात होती. पोलिसांनी तेथून पती-पत्नीला ताब्यात घेतले. दोघांनी विवाहितेला कोणाकडे पाठविले याची माहिती दिली व तिच्या अंगावरील दागिने विक्री केल्याचीही कबुली दिली.
संशयित तमाशातील कलाकार
विवाहितेला ज्या व्यक्तीच्या ताब्यात दिले तो जिभाऊ तमाशात कलाकार म्हणून काम करतो तर म्हसावद येथील दलाल महिला व चिचखोपा येथील महिला अशा दोघीही तमाशात काम करतात. त्यामुळे तिघांमध्ये ओळख होती व पतीने सोडलेली एक विवाहिता असून तिला तुझ्याकडे आणून देऊ अशी हमी यांनी त्याला दिली होती. पोलिसांनी या जिभाऊला त्याच्या मुळ गावातून ताब्यात घेतले. गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.