विकासाच्या आड धर्म आणून सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न- माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील
By सुनील पाटील | Published: July 2, 2023 08:37 PM2023-07-02T20:37:19+5:302023-07-02T20:38:41+5:30
भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे दोन दिवसीय कार्यकर्ता संमेलन झाले.
जळगाव : देश विकासासाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. राजकारणात धर्म आल्यास विनाश अटळ आहे. अमेरिका, जर्मनी आदी पाश्चात्य देशांचा विकास विज्ञानाच्याच बळावर झालेला आहे. त्यांनी धर्म विकासाच्या आड येऊ दिला नाही. भारतात मात्र विकासाच्या आड धर्म आणून सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न आजच्या सत्तेतील काही जण करीत असल्याची टिका उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील यांनी रविवारी सायंकाळी भारत जोडो अभियानंतर्गत कार्यकर्ता संमेलनात केली.
भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे दोन दिवसीय कार्यकर्ता संमेलन झाले. रविवारी त्याचा समारोप झाला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात कोळसे पाटील बोलत होते. व्यासपीठावर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, विचारवंत निरंजन टकले, जलजन जोडो अभियानाचे संजय सिंग, राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य, अजित झा, नूतन मालवी, राजू भिसे, अविनाश पाटील, धनाजी गुरव, सुभाष वारे, रफिक फारुखी, फिरोज मीठीबोरवाल, सुनीती सूर, ललीत बाबर, प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे व करीम सालार उपस्थित होते. संकल्प वाचनाने समारोपाची सुरुवात झाली. मनिषा धांडे यांनी संकल्प वाचन केले. प्रतिभा शिंदे यांनी आभार मानले.
जाती,धर्माच्या नावाने हिंसा वाढल्या : मेधा पाटकर
एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना दुसरीकडे आपल्यासमोर मोठी आव्हाने आहेत. जाती, धर्माच्या नावाने हिंसा वाढू लागल्या आहेत. काही गोष्टी जाणीवपूर्वक थोपविल्या जात आहेत, त्याला विरोध केला पहिजे. महाराष्ट्रात तर आग लावण्याचे काम होत असल्याची टिका नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली. सर्वांनी एकजुटीने विरोध करायचा असून जनतेत जागृती करण्याबाबत आवाहन केले.
महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ जागा आपल्या विचाराच्या असाव्यात
मोदी, शहा आजाराची लक्षणे आहेत. आपल्याला आजारावरच उपचार करायचे आहेत. आपला भय समोरच्याचा विजय आहे. त्यासाठी आपल्याला निर्भयपणे काम करायचे आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ खासदार आपल्या विचाराचे निवडून येतील, यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन विचारवंत निरंजन टकले यांनी केले. २०१४ मध्ये पहिल्यांदाच नवीन १६ कोटी मतदार वाढले. याआधी ९ कोटी वाढले होते. संघाने ११ वी पासूनच्या विद्यार्थ्यांच्या मनातच आपला अजेंडा बिंबवण्याचे काम केले आहे.
लोकसभा, विधानसभेची रणनिती
या संमेलनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील २८८ विधानसभा व ४८ लोकसभा मतदार संघाची गट चर्चा करुन पुढची रणनिती ठरविण्यात आली. प्रत्येक प्रतिनिधीने मतदार संघानिहाय प्रेझेंटेशन केले. कोणत्या मतदार संघात कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय उमेदवार बघून घेतला जाणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.