जळगाव राष्ट्रवादी महानगराध्यक्षांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, पाच लाखांची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 09:27 AM2020-10-21T09:27:52+5:302020-10-21T09:28:43+5:30
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना १५ रोजी रात्री ९ वाजता मुंबईहून परत येत असताना एका महिलेचा मोबाईलवर कॉल आला. मला तुम्हाला भेटायचे आहे, असे ती म्हणाली. त्यानुसार पाटील यांनी या महिलेला रिंगरोड कार्यालयात बोलविले होते.
जळगाव : एका राजकीय नेत्याला अडकवून ज्या पद्धतीने त्याचे अश्लिल फोटो व्हायरल करण्यात आले, अगदी त्याच धर्तीवर राष्ट्रवादीचे शहर महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्यासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका महिलेला पाच लाखांची सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा सोमवारी करण्यात आला.
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना १५ रोजी रात्री ९ वाजता मुंबईहून परत येत असताना एका महिलेचा मोबाईलवर कॉल आला. मला तुम्हाला भेटायचे आहे, असे ती म्हणाली. त्यानुसार पाटील यांनी या महिलेला रिंगरोड कार्यालयात बोलविले होते. याठिकाणी महिलेने आपल्याला अभिषेक पाटील यांना ‘हनी ट्रप’ मध्ये अडकविण्यासाठी कशी सुपारी दिली आहे, त्यात कोण सहभागी आहे, याबाबत माहिती दिली होती. त्याचा सविस्तर खुलासा पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महारानगराध्यक्ष या नात्याने मनपातील व इतर अनेक गैरकारभार, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणले आहेत, त्यामुळे विरोधकांकडून खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. हा अश्लाघ्य प्रकार त्याचाच भाग असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
पुराव्याच्या आधारावर पुढील कारवाई
अभिषेक पाटील यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न फसला असला तरी संबंधित महिला व तिच्यामागे असलेल्या चेहºयांचा पर्दाफाश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी महानगर, युवक तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी जिल्हा पेठ पोलस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्याशी शिष्टमंडळाने तासभर चर्चा केली. त्यावर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झालेली आहे. आता जबाब व पुराव्याच्या आधारावर चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अभिषेक पाटील यांचा तक्रार अर्ज तसेच जबाब व त्या महिलेचाही जबाब या कागदपत्रात आहे. सखोल तपास करुन कारवाई केली जाईल.
- अकबर पटेल, पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठ