पहूर येथे युवकाला मारहाण, ३० जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 09:56 PM2019-01-08T21:56:26+5:302019-01-08T21:57:10+5:30
व्यायामाचे साहित्य ठेवण्यावरून वाद
पहूर, जि. जळगाव : जय बजरंग व्यायाम शाळेत व्यायाम साहित्य ठेवण्याच्या कारणावरून पेठमधील रहिवासी शुभम् मधुकर देशमुख या युवकाला झालेल्या मारहाण प्रकरणी २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी शुभम्वर जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्राप्त माहितीनुसार शुभम् मधुकर देशमुख हा गुरवार ३ रोजी जय बंजरंग व्यायाम शाळेत व्यायाम करण्यासाठी गेलेला होता. यादरम्यान व्यायाम साहित्य ठेवण्याच्या कारणावरून भैय्या कुमावत याने शिविगाळ करून लोखंडी शस्त्राने डोक्यावर मारहाण केली. त्याचबरोबर विशाल कोंडे यांच्यासह २५ ते ३० जणांनी चापटा बुक्यानी मारहाण केली होती. त्यात गंभीर जखमी झालो, असे शुभम्ने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत शुभम्च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्द अवस्थेत होता.
शुध्दीत आल्यानंतर शुभम् देशमुखने जिल्हा पेठ पोलिसांना जबाब दिला. त्यावरून पहूर पोलिसात भैय्या कुमावत, विशाल कोंडे यांच्यासह कसबेगावातील २५ ते ३० जणांविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणामुळे पहूर येथील वातावरण ढवळून निघाले आहे. पुढील तपास पो.कॉ. किरण गायकवाड करीत आहे.