राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याकडून उपमहापौरपदासाठी "लॉबिंग"चा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:04+5:302021-03-18T04:16:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारीसंदर्भात भाजप आणि शिवसेनेत जोरदार घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल ...

Attempted "lobbying" by a local NCP leader for the post of Deputy Mayor | राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याकडून उपमहापौरपदासाठी "लॉबिंग"चा प्रयत्न

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याकडून उपमहापौरपदासाठी "लॉबिंग"चा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारीसंदर्भात भाजप आणि शिवसेनेत जोरदार घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या जळगावातील एका बड्या नेत्यानेही आपल्या मर्जीतील इच्छुकांना संधी मिळावी म्हणून लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. सुनील महाजन, ललित कोल्हे व नितीन लढ्ढा यांना फोन करून संबंधित नेत्याने जयश्री महाजन यांचा महापौरपदाच्या उमेदवारी अर्जदेखील मागे घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती शिवसेनेच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. याबाबत मंगळवारी रात्री घडलेल्या या विशेष घडामोडीनंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित नेत्याला समज दिल्यानंतर कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपदाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचनादेखील एकनाथ शिंदे यांनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यातील एका राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपचे विद्यमान उपमहापौर सुनील खडके यांच्या नावासाठी आग्रही होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्याने मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना त्यांच्या पत्नी जयश्री महाजन यांचा अर्ज महापौरपदासाठी दाखल करू नये, तुम्ही जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांच्या नावाचा व्हीप का काढला, तुम्हाला अधिकार कुणी दिले, असे सांगत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एव्हढेच नव्हे, तर भाजपचे माजी महापौर व आता शिवसेनेच्या बाजूने असलेले ललित कोल्हे यांनाही संपर्क करून तुझ्या बाजूच्या १० नगरसेवकांना जयश्री महाजन यांना मतदान करू नये म्हणून सांग, असे सांगितले. मात्र, यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.

तुम्ही या भानगडीत पडू नका, मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

शिवसेनेच्या नगरसेवकांनी याबाबत वरिष्ठ नेत्यांना माहिती दिल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादीच्या त्या नेत्याला फोन करून आता सारी सूत्रे जमलेली आहेत. तुम्ही या भानगडीत पडू नका, असे सांगितले. त्यानंतर या साऱ्या प्रकरणावर पडदा पडल्याचीदेखील सूत्रांची माहिती आहे.

अखेर निश्चित झाले कुलभूषण पाटील यांचे नाव

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने उपमहापौरपदासाठी सुनील खडके यांचे नाव लावून धरले, तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनादेखील फोन करून उपमहापौरपदी सुनील खडके यांचे नाव निश्चित करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करण्याबाबत विनंती केली. मात्र, जयंत पाटील यांनी याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट या नेत्याशी संपर्क साधल्यानंतर कुलभूषण पाटीलच शिवसेनेचे उपमहापौरपदाचे उमेदवार राहतील, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर संबंधित नेत्याला माघार घ्यावी लागल्याची माहिती शिवसेनेच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Attempted "lobbying" by a local NCP leader for the post of Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.