एसटीच्या खाजगीकरणामागे गैरव्यवहाराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:02+5:302021-06-05T04:13:02+5:30
शिवराम पाटील यांचा आरोप : निर्णय मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट पत्रपरिषद: जिल्हा जागृत जनमंचचा आरोप ...
शिवराम पाटील यांचा आरोप : निर्णय मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट
पत्रपरिषद: जिल्हा जागृत जनमंचचा आरोप
जळगाव : कोरोनामुळे आधीच एस.टी. महामंडळ तोट्यात गेले असतांना, त्यात राज्य परिवहन महामंडळाने नवीन ५०० बस भाडेतत्त्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महामंडळाच्या सरकारी बसेस व त्यावरील चालक कमी करून, मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे अध्यक्ष शिवराम पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच परिवहन मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत भेट घेऊन केली असल्याचेही शिवराम पाटील यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला जागृत जनमंचच्या सचिव डॉ. सरोज पाटील, अखिल भारतीय युवक महासंघाचे अध्यक्ष अजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल नाटेकर, सतीश वाघ उपस्थित होते.
शिवराम पाटील यांनी सांगितले की, सुरुवातीला ५०० बस भाड्याने घेतील आणि त्यानंतर पुन्हा टप्प्या-टप्प्याने भाडेतत्त्वावर बस घेऊन महामंडळाला खाजगीकरणाकडे घेऊन जातील. या निर्णयामुळे महामंडळाच्या सध्याच्या बसेस व त्यावरील चालक बेकार होऊन त्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयाला कामगार संघटनांनीही विरोध दर्शविला असून, त्यांनी याबाबत आमच्या संघटनेला पाठिंब्याचे पत्रही दिले असल्याचे शिवराम पाटील यांनी सांगितले.
इन्फो :
नाना पटोले मुख्यमंत्र्यांना पत्र देणार
यावेळी शिवराम पाटील यांनी सांगितले की, परिवहन विभागाच्या चुकीच्या निर्णयाबाबत नाना पटोले यांची भेट घेतली. पटोले यांना बस भाडेतत्त्वावर घेण्यामागे गैरव्यवहार असल्याचे सांगितले. यावर पटोले यांनी या निर्णयाबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच जर पंधरा दिवसांत हा निर्णय मागे घेतला नाही, तर आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.