जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्षे कारावासाची शिक्षा
By सुनील पाटील | Published: November 8, 2022 04:45 PM2022-11-08T16:45:56+5:302022-11-08T16:46:34+5:30
विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
शाळेच्या मुतारीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या विशाल उर्फ दिगंबर अशोक जाधव उर्फ कोळी (वय २०,रा.दहिवद, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी मंगळवारी हा निकाल दिला. विशाल याला पाच कलमांमध्ये दोषी धरण्यात आले.
यासंदर्भात माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी १६ फेब्रुवारी २०१६ दुपारी तीन वाजता चाळीसगाव तालुक्यातील एका शाळेत असताना इतर मैत्रीणींसोबत लघुशंकेसाठी गेली होती. तेथे विशाल याने दोन मुलींना पकडून छेड काढली. त्यातील एकीने त्याच्या हाताला चावा घेऊन सुटका करुन घेतली होती. दुसऱ्या मुलीवर त्याने बलात्काराचा प्रयत्न करीत असताना सुटका करुन पळून गेलेली मुलगी शाळेतील शिक्षकांना घेऊन घटनास्थळी आली तेव्हा पीडितेची सुटका झाली.
याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात कलम ३५४, ३७६ सह ५११ तसेच पोक्सोचे कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी जे.आर.सातव यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात चालला. विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी करुन ११ साक्षीदार तपासले. यात पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शिक्षक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. ॲड. बोरसे यांचा प्रभावी युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेले पुरावे पाहून विशाल याला पाच कलमांमध्ये दोषी धरण्यात आले. बचावपक्षातर्फे ॲड.संदीप पाटील यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.