आत्महत्येचा प्रयत्न करीत पोलीस स्टेशन पेटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:16 AM2021-03-27T04:16:10+5:302021-03-27T04:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयिताना अटक केली नाही, याचा राग येऊन संतोष नारायण कुमावत (वय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयिताना अटक केली नाही, याचा राग येऊन संतोष नारायण कुमावत (वय ४०, रा. पाळधी, ता. जामनेर) या प्रौढाने रामानंदनगर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत तोडफोड केली. या दरम्यान त्याने चक्क विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर पेट्रोल ओतून पोलीस ठाणे पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत समजूत घातल्याने सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. २४ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. या प्रकरणी २५ रोजी मध्यरात्री संबंधित प्रौढावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील पाळधी येथील संतोष नारायण कुमावत यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी, शालक व पत्नीचा मित्र या तिघांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात कुमावत हे फिर्यादी आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांनी तपास केला नाही, संबंधिताना अटक केली नाही, याचा राग आल्यामुळे कुमावत यांनी २४ मार्चला दुपारी ४ वाजता दुचाकीने (एमएच १९ डीएस ६२५४) रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी खिशात कीटकनाशकाची बाटली आणली होती. सुरुवातीला त्यांनी ठाणे अंमलदार व उपस्थित पोलिसांना शिवीगाळ करीत आत्महत्या करण्याची धमकी दिली. यानंतर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी कुमावत यांची समजूत काढली. परंतु, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यावेळी विषारी औषध पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी लागलीच त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेत पुन्हा त्यांची समजूत घातली.
फायबरची शीट तोडून तोडफोड
बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत कुमावत हे पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून होते. यानंतर ९.३० वाजता त्यांनी पुन्हा प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक बडगुजर यांनी पुन्हा एकदा कुमावत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुमावत यांनी बडगुजर यांच्या दालनातील फायबरची शीट तोडून तोडफोड केली व गोंधळ घातला.
पोलीस ठाणे पेटवून देण्याची धमकी
रात्री पोलिसांनी समजूत घातल्यानंतर कुमावत याने ठाणे अंमलदार यांच्या टेबलजवळ येऊन बाटलीत आणलेले पेट्रोल ओतून पोलीस ठाणे पेटवून देतो अशी धमकी देत खिशातून आगपेटी काढली. सुदैवाने यावेळी पोलीस ठाण्यात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करून कुमावत यांना हातातून पेट्रोलची बाटली, कीटकनाशक व आगपेटी काढून घेतली. यानंतर पोलीस निरीक्षक बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुमावत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे तपास करीत आहेत.