सराईत गुन्हेगाराचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:46 AM2020-06-08T10:46:38+5:302020-06-08T10:46:51+5:30
पैशांची मागणी : हातावर पट्टीने मारुन औषधीचे सेवन
जळगाव : पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सागर महारु सपकाळे (२९, रा.प्रजापत नगर) याने रविवारी दुपारी साडे तीन वाजता शनी पेठ पोलीस ठाण्यात येऊन स्वत:च धारदार पट्टीने हातावर सपासप वार करुन उपचाराच्या १० गोळ्या सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, यावेळी पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली होती. सपकाळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. रविवारी दुपारी पावणे तीन वाजता तो शनी पेठ पोलीस ठाण्यात आला असता सिध्दार्थ बैसाणे यांच्याकडे पैशाची मागणी केली, यावेळी बैसाणे व इतर सहकाऱ्यांनी त्याची समजूत घालून घरी रवाना केले. त्यानंतर तो पुन्हा साडे तीन वाजता आला व गोळ्या सेवन करुन हातावर पट्टी मारुन घेतली.
उपचारास दिला नकार
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात नेले, मात्र त्याने तेथे उपचारास व दाखल होण्यास नकार दिला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. सिध्दार्थ बैसाणे यांच्या फिर्यादीवरुन सागर याच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.