पोलीस अधीक्षक कार्यालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:08+5:302021-01-15T04:14:08+5:30
जळगाव : आम्हाला कोणी न्याय देत नाही म्हणत शारदा श्रावण मोरे (३०,रा.पिंप्राळा, हुडको) या महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात ...
जळगाव : आम्हाला कोणी न्याय देत नाही म्हणत शारदा श्रावण मोरे (३०,रा.पिंप्राळा, हुडको) या महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी तिच्याविरुध्द कलम १९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यालयाचे हवालदार प्रकाश बळीराम मेढे यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता शारदा मोरे ही पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात आली. पोर्चच्या बाहेर अचानकच आम्हाला कोणी न्याय देत नाही असे म्हणत सोबत आणलेली रॉकेलची बाटली अंगावर ओतून ही बाटली फेकून दिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गार्ड ड्युटीचे प्रकाश मेढे, प्रसाद जोशी, राजेंद्र दोडे, मनोहर बाविस्कर, रवींद्र कोळी व दीपमाला सोनवणे यांनी धाव घेऊन महिलेला ताब्यात घेतले. नियंत्रण कक्षात या घटनेची माहिती दिली. या पोलिसांनी तिची समजूत घातल्यानंतर तिला तक्रार देण्यासाठी जिल्हा पेठ पोलिसांकडे पाठविले. थोड्यावेळाने ही महिला निघून गेली.
रामानंद नगर पोलीस ठाण्यातही गोंधळ
या महिलेने बुधवारी रात्री ८ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला. या महिलेचा मुलगा रोहन (१४) हा ११ रोजी घरातून निघून गेला होता. कुटुंबातील लोक रागावल्याने तो निघाला होता, परंतु घरी परतलाच नसल्याने या महिलेने मुलगा हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दुसऱ्या दिवशी हा मुलगा परत आला. या मुलाला कोणी तरी पळवून नेले होते व पोलीस त्याच्याविरुध्द कारवाई करीत नाही असा आरोप ही महिला करीत होती, म्हणून तिने दोन्ही ठिकाणी गोंधळ घातला. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी या महिलेची समजूत घालून या मुलाची चौकशी केली. त्यानंतर दोघांना घरी पाठविण्यात आले.