गिरड येथे जिल्हा बँक शाखा फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 05:16 PM2019-09-04T17:16:17+5:302019-09-04T17:17:21+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गिरड शाखा फोडण्याचा प्रयत्न ३ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांकडून झाला.

Attempts to break the District Bank branch at Gir | गिरड येथे जिल्हा बँक शाखा फोडण्याचा प्रयत्न

गिरड येथे जिल्हा बँक शाखा फोडण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देतिजोरीतील सर्व रक्कम सुरक्षितसीसीटीव्ही कॅमेऱ्याविना जिल्हा बँक शाखा

पी.डी.पाटील
गिरड, भडगाव, जि.जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गिरड शाखा फोडण्याचा प्रयत्न ३ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांकडून झाला. तिजोरी भक्कम असल्याने तिजोरीतील सर्व रक्कम सुरक्षित राहिली.
गिरड येथे मेन रोडवर जवाहर हायस्कूलजवळ जिल्हा बँकेची गिरड शाखा आहे. अज्ञात चोरट्यांनी या बँकेचे पुढील दोन्ही कुलूप तसेच कडीकोंडा तोडलेला दिसला. हा प्रकार बँकेशेजारीच असलेल्या गिरड वि.का. संस्थेचे शिपाई आत्माराम मनोरे सकाळी साफसफाई करायला गेल्यावर लक्षात आला. त्यांनी तत्काळ गावातील पोलीस पाटील विनोद मनोरे व शाखा व्यवस्थापक रावसाहेब धनराज बोरसे यांना फोन करून हा प्रकार सांगितला. तेव्हा बँकेचे मानधन तत्वावर काम करणारे लिपीक प्रभाकर जगताप, रामकृष्ण पवार तसेच शिपाई जितेंद्र सोनवणे यांच्यासमवेत शाखाधिकारी आले. त्यांनी भडगाव पोलिसांना कळविले. लगेचच सहाय्यक उपनिरीक्षक पठारे व बडगुजर, पोलीस नाईक हिरालाल पाटील यांनी चौकशी केली.
चौकशीअंती असे दिसून आले की, चोरट्यांना कोणतीही रक्कम बँकेतून चोरता आली नाही किंवा बँकेची कागदपत्रेदेखील जागेवरच होती. तिजोरी भक्कम असल्याने चोरट्यांना तोडता आली नाही. त्यांनी दगड व इतर साहित्य वापरून मुख्य दरवाजाचा कडीकोंडा कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिजोरी फोडण्यासाठी वापरलेले दगड व इतर साहित्यदेखील तिजोरीजवळच ठेवून चोरट्यांनी पळ काढला.
बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांना चांगलेच फावले. बँकेतील शेतकऱ्यांंच्या जमा रकमांवर चोरट्यांची नजर पडू लागली असल्याने जिल्हा बँकेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, अशी मागणी गावासह परिसरातून होत आहे. या घटनेबद्दल अज्ञात चोरट्यांविरूद्ध तक्रार शाखाधिकारी बोरसे यांनी भडगाव पोलिसात दिली आहे.

तिजोरीत चार लाख ८० हजार रुपये रक्कम होती. ही सर्व रक्कम तिजोरीत सुरक्षित आहे. बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मुख्यालयी मागणी करणार आहे.
-रावसाहेब धनराज बोरसे, शाखा व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा गिरड, ता.भडगाव

Web Title: Attempts to break the District Bank branch at Gir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.