ं निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 01:18 AM2017-02-23T01:18:22+5:302017-02-23T01:18:22+5:30
अमळनेर/ पारोळा/ चोपडा : दुपारी दोनपर्यंत निकाल हाती येणार
अमळनेर/पारोळा/चोपडा : गेल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होत आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी होती. १६ रोजी मतदान झाल्यानंतर सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते. सर्वच पक्षांनी विजयाचा दावा केलेला असला तरी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे, याचा फैसला आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
अमळनेर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निवडणूक निरीक्षक विशेष लक्ष ठेवून असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.
निवडणूक निरीक्षक दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत आज मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. सुमारे १०० कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. इंदिरा भुवनमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी केली जाईल. १६ टेबलांवर मतमोजणी होईल. आठ टेबलांवर एकाचवेळी चार जि.प.गटाची तर उर्वरित आठ टेबलांवर पंचायत समिती गणांची मतमोजणी होईल. २७ फेºयांमध्ये मतमोजणी होईल. सुसूत्रतेसाठी मतदान यंत्र (ईव्हीएम मशीन) ने-आण करण्यासाठी जि.प., पं.स.साठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना वेगवेगळ्या रंगांचे टी-शर्ट देण्यात आले आहेत. प्रत्येक फेरीनुसार निकालाची आकडेवारी, आॅनलाइन निवडणूक आयोगाला कळवण्यात येणार आहे.
१०० कर्मचारी नियुक्त
निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, ८ पोलीस अधिकारी, ६१ पोलीस कर्मचारी, २३ होमगार्ड नियुक्त केले आहेत.
जि.प.साठी दोन मतमोजणी प्रतिनिधी तर पं.स.साठी एक प्रतिनिधी प्रत्येक उमेदवाराला देता येणार आहे.
पारोळा
येथे मतमोजणी नवीन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. सकाळी ९.३० वाजेपासून मतमोजणी सुरू होईल.
मतमोजणीसाठी १६ टेबल लावण्यात येतील. यात जि.प. व पं.स.साठी प्रत्येकी आठ-आठ टेबल असतील. मतमोजणीसाठी ७० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.
चार नायब तहसीलदार, १० मंडळ अधिकारी, २४ तलाठी आदींचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होणार आहे.
चोपडा
येथे मतमोजणी महाराष्ट्र शासनाच्या वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी बारा टेबलांची मांडणी केली आहे. प्रत्येक गणासाठी एक टेबल या प्रमाणे बारा टेबल अशी २४ टेबलची मांडणी केली आहे. एकाच गट आणि गणांची मतमोजणी होणार असल्याने केवळ दोन तासात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी अधिकारी ते शिपाई असे शंभर कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.
मतमोजणीच्या वेळी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली. त्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी बिरबल वळवी, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, डॉ. स्वप्निल सोनवणे, महेश साळुंखे आदी परिश्रम घेत आहेत.
मतमोजणीच्या सुरुवातीला टपाली मतदान मोजले जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. यंदापासून आॅनलाइनच विजयाचे प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. नियंत्रणासाठी अतिशीघ्र दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
४गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे लक्ष निकालाकडे लागून आहे. कोण विजयी होणार, ते निकालानंतरच स्पष्ट होईल.