बॅकलॉग परीक्षेच्या पहिल्या दिवशी ६४ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 06:37 PM2021-01-05T18:37:29+5:302021-01-05T18:37:39+5:30
विद्यापीठ : किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता परीक्षा सुरळीत
जळगाव : विद्यापीठाच्या कला, विज्ञान व वाणिज्य पदवी, व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांतर्गत २, ४ व ६ या सत्रातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांना मंगळवारपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ६४ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ३६ टक्के विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
सकाळी ९ वाजता पहिल्या ऑनलाईन पेपरला सुरूवात झाली. काही विद्यार्थ्यांना सुरूवातीला लॉगिन होण्यास पाच ते दहा मिनिटांचा वेळ लागत होता. या तांत्रिक अडचणीतून सुटका करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लागलीच आयटी समन्वयकांना संपर्क साधून ती समस्या सोडवून घेतली. त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडली़ १२ हजार ५६७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, त्यापैकी मंगळवारी ६४ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
कुणी गल्लीतील कट्टयावर तर कुणी पार्किंगवर बसून दिली परीक्षा
संपूर्ण परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी काहींनी छतावर बसून तर काही महाविद्यालयाच्या पार्किंगवर बसून परीक्षा दिली. ६० गुणांची परीक्षा होती, विद्यार्थ्यांना ४० प्रश्न सोडावयाचे होते. यासाठी तीन तासांचा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.
एकूण परीक्षार्थी - १२ हजार ५६७
वाणिज्य विद्याशाखा परीक्षार्थी - २ हजार ९५
व्यवस्थापन शास्त्राचे परीक्षार्थी - २१२,
विज्ञान शाखेचे परीक्षार्थी - ६ हजार ५८०
कला व मानव्य विज्ञानचे परीक्षार्थी - ३ हजार ६७१
सामाजिक कार्याचे परीक्षार्थी - ०९
आयटी समन्वयक - ४११