चाळीसगावला मान्सूनची मुहूर्तावर हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:37+5:302021-06-10T04:12:37+5:30
चाळीसगाव : मंगळवारी आणि बुधवारीही चाळीसगाव परिसरातील काही भागात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावत आठ रोजीचा मुहूर्त बरोबर साधला. मान्सूनच्या ...
चाळीसगाव : मंगळवारी आणि बुधवारीही चाळीसगाव परिसरातील काही भागात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावत आठ रोजीचा मुहूर्त बरोबर साधला. मान्सूनच्या हलक्या सरी बळीराजासाठी उत्साहवर्धक ठरल्या असून शेती-शिवारातील लगबग वाढली आहे. या सरींनी ‘पेरते व्हा’ असाच संदेश दिला आहे. दमदार पावसानंतर पेरणीसाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल वाढणार आहे.
केरळातून सुरू झालेल्या मान्सूनचा प्रवास मुंबईमार्गे खान्देशातही पोहचला असून मंगळवारी चाळीसगाव तालुक्याच्या काही भागात आणि शहरातही रात्री आठ वाजता त्याने हजेरी लावली. बुधवारीदेखील दिवसभर ऊन-सावलीच्या खेळात हलक्या सरी बरसल्या. विजांच्या कडकडाटात आभाळाने काळी शाल पांघरल्याचे दृश्य शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरले आहे. दुपारी बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी साहित्य विक्री दुकानांमध्ये दाखल झाल्याचे दिसून आले.
...........
चौकट
मान्सूनपूर्व कपाशीचा पेरा
गेल्यावर्षी पर्जन्यमानाच्या सेंच्युरीने विहिरींची पाणीपातळी उंचावली आहे. मध्यम प्रकल्पांमध्येही पाणीसाठा चांगला असल्याने मान्सूनपूर्व कपाशी लागवडही सुरू आहे. साधारणतः अक्षय तृतीयेपासून ही लागवड केली जाते. यावर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने मान्सूनपूर्व कपाशी लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. ही लागवड १५ जूनपर्यंत केली जाते.
........
चौकट
मृग सरी अन् वाहन गाढव
दि. ८ पासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. यंदा मृग नक्षत्राला सरींनी सलामी दिल्याने शेतकरी आनंदित झाले असले तरी, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्राचे वाहन गाढव आहे. पुढचे १३ दिवस मृग नक्षत्राचे असून २१ पासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होणार आहे.