पहूर ग्रा.पं.निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 06:55 PM2018-01-03T18:55:57+5:302018-01-03T18:58:29+5:30
पहूर पेठ ग्रा.पं.निवडणूक : भाजपाच्या निष्ठावंतांचा शिवसेनेत प्रवेश
मनोज जोशी / आॅनलाईन लोकमत
पहूर, ता.जामनेर, दि. ३ : पेठ ग्रामपंचायतीसाठी आगामी मार्च महिन्यात होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. भाजपामधील अंतर्गत मतभेदाचा लाभ घेण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे, तर राष्ट्रवादीने देखील निवडणुकीच्या निमित्ताने कंबर कसल्याने ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण तापले आहे.
२५ वर्षांपासून राष्ट्रवादीकडे सत्ता
पहूर पेठमधील भाजपाच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे स्थानिक राजकारणातील समिकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. पहूरच्या राजकारणात आमदार किशोर पाटील यांचा झालेला हस्तक्षेप पुढील राजकारणाची नांदी असल्याचे बोलले जात आहे. ही निवडणूक जामनेर तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सरपंच प्रदीप लोढा यांच्या हातात सत्ता आहे.
भाजपा पदाधिकाºयांचा सेनेत प्रवेश
सेनेच्या नवीन खेळीने येथील राजकारणात रंगत आली आहे. तर मागील महिन्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शनिवारी आमदार किशोर पाटील, सेना नेते दीपकसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपाचे पदाधिकारी तथा प्रगतीशिल शेतकरी प्रकाश पंढरीनाथ पाटील यांच्यासह सहा ते सात जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे स्थानिक राजकारण ढवळून निघत आहे. अंतर्गत नाराजीमुळे प्रकाश पाटील यांनी सेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आला आहे.
ग्रा.पं.निवडणुकीत बिनविरोधला फाटा
ही निवडणूक सर्वांना विश्वासात घेऊन बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र काहींचा या निर्णयाला विरोध असल्याने निवडणूक अटळ आहे. विद्यमान सरपंच प्रदीप लोढा यांनी गेल्या २५ वर्षांपासून एकहाती सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. त्यांना आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबतच आमदार किशोर पाटील यांचे कडवे आवाहन असणार आहे.