'स्मार्ट सिटी'साठी वेधले संसदेचे लक्ष
By admin | Published: March 4, 2015 03:20 PM2015-03-04T15:20:22+5:302015-03-04T15:20:22+5:30
केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात जळगाव शहराचा समावेश व्हावा व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी खासदार ए.टी. पाटील यांनी मंगळवारी संसदेत प्रश्न केले.
जळगाव: केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात जळगाव शहराचा समावेश व्हावा व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी खासदार ए.टी. पाटील यांनी मंगळवारी संसदेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.
'स्मार्ट सिटीत जळगावच्या समावेशाची शक्यता कमीच', 'राजकीय पाठपुराव्याची गरज' या मथळ्याखाली 'लोकमत'ने २ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून 'स्मार्ट सिटी'त देशात १00 शहरांची निवड केली जाणार आहे.
त्यात शहरांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यात महाराष्ट्रातील निवडक ७-८ शहरांचा समावेश होणार आहेत. विकासासाठी जपान व अन्य राष्ट्रांचा निधी या शहरांना मिळणार असल्याने अनेक नेत्यांनी राजकीय शक्ती पणाला लावली आहे.
क्रीडा क्षेत्रावर वेधले लक्ष
'स्मार्ट सिटी'सह ग्रामीण क्षेत्रात क्रीडा प्रकाराला न्याय देण्यासाठी केंद्र सरकारची काय योजना आहे व जळगाव जिल्ह्यात कबड्डी व कुस्तीसाठी लागणार्या साधन सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करून खासदार ए.टी. पाटील यांनी संसदेचे लक्ष वेधले. त्यावर क्रीडा व युवा कार्यक्रम राज्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राजीव गांधी खेळ अभियानातून ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर थेट योजना राबविली जाणार आहे. तालुका स्तरावर आधुनिक सुविधा व क्रीडा मैदानांच्या विकासावरही खासदार पाटील यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.
कबड्डीबाबत चर्चा
कबड्डी व कुस्ती हे खेळ आंतरराष्ट्रीय असूनही ते विशिष्ट भागापुरतेच र्मयादित आहेत. जळगाव व उत्तर महाराष्ट्र हा भाग नेहमीच या खेळात अग्रेसर आहे. आपण स्वत: कबड्डीचे खेळाडू राहिलो आहे. त्यामुळे या खेळाकडे सरकारने अधिक लक्ष देण्याची मागणी खासदार पाटील यांनी केली.