पाच महिन्यांसाठी २१ वाळू गटांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:46+5:302021-01-08T04:49:46+5:30
जळगाव : जिल्ह्यातील पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेल्या २१ वाळू गटांची ई-लिलाव आणि ई-निविदा प्रक्रिया सोमवारी प्रशासनाने जाहीर केली असून ...
जळगाव : जिल्ह्यातील पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेल्या २१ वाळू गटांची ई-लिलाव आणि ई-निविदा प्रक्रिया सोमवारी प्रशासनाने जाहीर केली असून यानुसार सोमवारपासूनच निविदा भरण्यास सुरुवात झाली आहे. २० जानेवारीला या निविदा उघडण्यात येणार आहेत. दरम्यान, या लिलाव आणि निविदांची ९ जून २०२१ पर्यंतच मुदत राहणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे.
यात सोमवार ४ ते १५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून १५ रोजी सायंकाळी पाच वाजता ही नोंदणी बंद होणार आहे. १९ जानेवारीपर्यंत रक्कम जमा करणे अनिवार्य राहील, तसेच ४ ते १९ जानेवारीपर्यंत निविदा ऑनलाइन जमा करणे, १९ रोजी सायंकाळी ई-निविदा ऑनलाइन स्वीकारणे बंद होणार आहे. तर २० जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ई-ऑक्शन ऑनलाइन सुरू राहील. त्यानंतर ३ वाजल्यानंतर पुढे ई-निविदा उघडण्यात येणार आहेत.
या गटांचा वाळू लिलाव
वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बुद्रूक, केऱ्हाळे बुद्रूक, धुरखेडा, पातोंडी, दोंधळे, बलवाडी, घाडवेल, धावडे, सावखेडा, बांभोरी प्र.चा., आव्हाणी, नारणे, टाकरखेडा, वैजनाथ, उत्राण अ.ह., भोकर, पळसोद आदी गटांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ७० हजार २८६ ब्रास हा एकत्रित अंदाजित वाळूसाठा आहे. त्याची अपसेट प्राइज ही २८ कोटी ६४ लाख ८५ हजार ७३६ इतकी आहे.