जळगाव जिल्ह्यातील पतसंस्था कर्जदारांच्या ७६ मालमत्तांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:49 PM2018-05-10T12:49:04+5:302018-05-10T12:49:04+5:30
दहा कोटींची वसुली होणार
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १० - जिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्थांमधील थकीत कर्जदारांच्या एकूण ७६ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असून त्यापोटी दहा कोटी रुपयांची वसुली होईल. कर्जदारांच्या मालमत्तांचा लिलाव करताना त्या पतसंस्थांच्या ठेवीदारांना लिलावात पंधरा टक्के रोख रक्कम भरून सहभागी होता येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली.
गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे थकीत कर्जदारांच्या मालमत्तेचा शोध घेण्यात आला. कर्जदारांना नोटिसा देवून कर्जाची थकीत रक्कम भरण्यास सांगितली गेली. मात्र त्यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने पतसंस्थांच्या वतीने संबंधित निबंधकांनी थकीत कर्जदारांच्या मालमत्तांचा लिलाव काढला आहे. यात महात्मा फुले पतसंस्था, बढेसर पतसंस्था (वरणगाव), संतोषी माता मर्चंट पतसंस्था, तापी अर्बन पतसंस्था (भुसावळ), यावल तालुका अर्बन पतसंस्था, यावल, बामणोद ग्रामीण बिगर शेती पतसंस्था (बामणोद), जे.टी.महाजन पतसंस्था (फैजपूर), सावदा फैजपूर पतसंस्था (ता.रावेर) या पतसंस्थांच्या कर्जदारांच्या ६९ मालमत्ताचा लिलाव होईल. त्यातून एकूण ९ कोटी ३९ लाख रक्कम वसूल होईल. यावल येथील महालक्ष्मी पतसंस्थेची एक मालमत्ता ३१ लाख ९१ हजार रुपये, सावदा येथील स्वामी समर्थ पतसंस्थेच्या सहा मालमत्ता ९३ लाख ९५ हजारांत विकल्या जातील. ठेवीदारांनी तालुक्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा व लिलावात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.