कराची रक्कम थकल्याने श्री विंध्या पेपर मिलचा लिलावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:58 AM2019-05-22T11:58:18+5:302019-05-22T11:58:46+5:30
जळगाव : कराची रक्कम थकविल्याने दुसखेडा, ता.यावल येथील श्री विंध्या पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेडच्या ८८ हजार ५८४ चौरस मीटर ...
जळगाव : कराची रक्कम थकविल्याने दुसखेडा, ता.यावल येथील श्री विंध्या पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेडच्या ८८ हजार ५८४ चौरस मीटर जागा ‘जीएसटी’ (वस्तू व सेवा कर) विभागाने लिलावात काढली आहे.
या बाबत जीएसटी विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, श्री विंध्या पेपर मिल प्रायव्हेट लिमीटेडकडे विक्रीकर विभागाकडे २००१-०२पासून मूल्य वर्धीत कर (व्हॅट) व मुंबई विक्री कराची (बीएसटी) ३ कोटी ४० लाख ५१ हजार ४५० रुपयांची थकबाकी आहे. अनेक वेळा कंपनीचे संचालक शेखर सोमाणी, नंदकुमार सोमाणी, राजकमल मिश्रा यांना याप्रकरणी नोटीस देवून थकबाकी भरण्यास सांगितले. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे जीएसटी विभागाने मिलच्या ८८ हजार ५८४ चौरस मीटर जागेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती राज्य कर अधिकारी एन.के.नेरकर यांनी दिली.
श्री विंध्या पेपर मिल कंपनीकडे जीएसटी विभागाची कराची बाकी ३ कोटी ४० लाख ५१ हजार ४५० रुपयांची थकबाकी तर त्यावर ४ कोटी ६४ लाख ९० हजार व्याज असे एकूण ८ कोटी ६ लाख ४२ हजार ३७८ रुपयांची बाकी आहे. त्याची वसुली या लिलावातून करण्यात येणार आहे. २१ मे रोजी मिलच्या जागेचा लिलाव होता, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा सर्व प्रक्रिया करून पुन्हा लिलाव करण्यात येणार असल्याचे नेरकर यांनी सांगितले.