सुवर्णमयी नटसम्राट नाट्यअभिवाचनाने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:00 PM2020-12-23T21:00:41+5:302020-12-23T21:01:10+5:30
साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन
जळगाव - मूळजी जेठा महाविद्यालयाच्या साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी ६ वाजता महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळेस नटसम्राट या नाटकाला रंगभूमीवर येण्यास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुवर्णमयी नटसम्राट या नाट्यअभिवाचनाचा प्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यअभिवाचनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.सी.ई.सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर होते. प्रमुख अतिथी म्हणून शाहीर विनोद ढगे, संस्कारभारतीचे मोहनत रावतोळे व ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी प्रास्ताविक केले.
आणि प्रेक्षकांची मिळविली दाद
कार्यक्रमात गणेश सोनार आणि प्रतिमा याज्ञिक यांनी साकारलेल्या वाचिक अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विशेषतः नटसम्राटमधील गणेश सोनार यांनी वाचलेल्या स्वगताना प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. त्यांच्यासोबत नाट्यअभिवाचनात दीपक महाजन, हेमलता चौधरी, नेहा पवार, संस्कृती पवनीकर, अमोल ठाकूर, चंद्रकांत चौधरी, विकास वाघ आदी कलावंतांचा सहभाग होता. या नाट्यअभिवाचनाचे दिग्दर्शक चिंतामण पाटील हे होते तर तांत्रिक बाजूंमध्ये प्रकाशयोजना पियुष रावळ, संगीत दर्शन गुजराथी, रंगमंच व्यवस्था दिनेश माळी, कपिल शिंगाणे, देवेंद्र गुरव, सिध्दांत सोनवणे,उमेश सोनवणे आणि नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थ्यांची होती. अभिवाचनासाठी नाट्यशास्त्र विभागप्रमुख हेमंत पाटील यांचे सहकार्य लाभले.
चळवळ लोकांपर्यंत पोहचण्यासाठी निश्चितच बळ मिळणार
सांस्कृतिक चळवळ वृध्दींगत होण्याकरिता मूळजी जेठा महाविद्यालयाचे मोठे योगदान असून, आता साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून ही चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यास निश्चितच बळ मिळेल, असे विनोद ढगे यांनी मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोपीचंद धनगर यांनी तर आभार डॉ.विलास धनवे यांनी मानले.