अधिकाऱ्यांचा लेखापरीक्षणाचा अभ्यासच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 14:00 IST2020-08-14T14:00:35+5:302020-08-14T14:00:46+5:30

खाजगी रुग्णालय ‘आॅडीट’ : अहवालही सादर होइना, दोन दिवसात कारवाई नाही

The audit study of the officers is just beginning | अधिकाऱ्यांचा लेखापरीक्षणाचा अभ्यासच सुरू

अधिकाऱ्यांचा लेखापरीक्षणाचा अभ्यासच सुरू

जळगाव : कोविड उपचाराची परवानगी देण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणीला आळा बसावा व त्यावर नियंत्रण रहावे म्हणून लेखा परीक्षासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून अद्याप लेखा परीक्षणाविषयी अभ्यासच सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाच्या दोन दिवसानंतर लेखा परीक्षण होऊ शकले नाही की संबंधित रुग्णालयांना नोटीस बजावणे असो की इतर कोणतीही कार्यवाही होऊ शकलेले नाही.
कोरोनाच्या संकटात दररोज नवनवे रुग्ण वाढत असून यासाठी शासकीय रुग्णालय, कोविड केअर सेंटर येथे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता उपचारासाठी दहा रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे़ यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच शुल्क आकारणी व्हावी, असे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.
या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशिक केले होते़ त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लेखा परीक्षणासाठी पथक नियुक्त करीत दर निश्चितीसंदर्भातही आदेश दिले.
आदेशाच्या दोन दिवसांनंतरही ‘जैसे थे’ स्थिती
कोरोनावर उपचार करणाºया खाजगी रुग्णालयांचे लेखा परीक्षण व दर निश्चितीचे जिल्हाधिकाºयांनी ११ आॅगस्ट रोजी आदेश देऊन त्याच दिवसापासून त्याच्या अंमलबजावणी संदर्भात निर्देश दिले. या आदेशाला दोन दिवस झाले तरी लेखा परीक्षकांकडून लेखा परीक्षण झालेले नाही.

अभ्यास काही सरेना,कारवाईला मुहुर्त मिळेना
कोरोना उपचारासाठी परवानगी देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांविषयी जादा शुल्क आकारणी संदर्भातील तक्रारी सोशल मीडियावर बिलासह व्हायरल झाल्या. बारा दिवसाचे तब्बल पाच लाख रुपये बिल आकारले जात असल्याने या विषयी अद्यापही लेखा परीक्षण झाले नाही की संबंधितांना नोटीस बजावली गेलेली नाही. तसेच काही रुग्णालयांविषयी असलेल्या तक्रारी संदर्भात लेखा परीक्षकांनी तक्रारदार तसेच संबंधित रुग्णालयाकडील कागदपत्रे घेतली आहे. मात्र त्याचाही अभ्यास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अवाढव्य बिले सुरूच
एका खासगी रुग्णालयात एक महिला दाखल होती़ या महिलेच्य मुलाला बील देण्यात आले आहे़ १ लाख ७० हजारांचे हे बील असून त्यात २० हजार रूपये अतिदक्षता विभागाचे प्रतिदिवस असे पाच दिवसांचे व दहा हजार रूपये सामान्य कक्षाचे प्रतिदिवस यानुसार शुल्क आकारणी करण्यात आल्याचा उल्लेख बिलात आहे़ त्यामुळे अधिकारी कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे़

अद्याप अहवाल आलेला नाही़ ज्या रुग्णालयांबाबत तक्रारी होत्या़ त्यांच्या तपासणीसाठी लेखापरिक्षक नेमले असून त्यांच्या अहवालानंतर तपासणी करून निर्णय घेतला जाईल़ शासकीय नियमापेक्षा अधिक शुल्क असेल तर रुग्णालयांना परतावा द्यावा लागेल़
- डॉ़ एऩ एस़ चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

लेखा परीक्षणासंदर्भात दिलेल्या आदेशाचा अभ्यास सुरू आहे. याची माहिती घेऊन लेखा परीक्षण करण्यात येईल.
- प्रकाश चौधरी, रुग्णालय लेखा परीक्षक

रुग्णालयासंदर्भात असलेल्या तक्रारींविषयी संबंधित तक्रारदारांकडून तसेच रुग्णालयांकडून कागदपत्रे घेण्यात आली आहेत. त्याचा अभ्यास करण्यात येत असून नंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
- रवींद्र जोशी, रुग्णालय लेखा परीक्षक

Web Title: The audit study of the officers is just beginning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.