जळालेल्या ‘कोर्टा’ची वास्तू देतेय ‘ऑगस्ट क्रांती’ची साक्ष
By admin | Published: May 19, 2017 12:24 PM2017-05-19T12:24:19+5:302017-05-19T12:24:19+5:30
महात्मा गांधींनी ब्रिटीशांना ‘चले जाव’ म्हणताच देश पेटून उठला. त्यात अमळनेरही मागे नव्हते.
अतुल जोशी / ऑनलाइन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. 19 - अमळनेर शहराची ओळख केवळ संताची भूमी, शिक्षण पंढरी एवढीच मर्यादीत नाही तर क्रांतीकारकांचीही भूमी म्हणून शहर प्रसिद्ध आहे. महात्मा गांधींनी ब्रिटीशांना ‘चले जाव’ म्हणताच देश पेटून उठला. त्यात अमळनेरही मागे नव्हते. मातृह्यदयी सानेगुरूजींचा कणखर आदेश येताच स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात अनेकांनी उडय़ा घेतल्या. ऑगस्ट क्रांती येथेही घडली. येथील क्रांतीकारकांनी एका रात्रीतून टपाल कार्यालय, रेल्वेस्थानक व न्यायालयाच्या इमारतीची होळी केली. या जाळलेल्या वास्तुंपैकी आज फक्त माळीवाडय़ात असलेली ‘कोर्टा’ची वास्तू ऐतिहासिक क्रांतीची, शुरविरांच्या पराक्रमाची साक्ष देत भगAावस्थेत उभी आहे.
8 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीश सरकारने आपली भारतातील सत्ता काढून घेण्याचा ऐतिहासिक ठराव कॉँग्रेसच्या कायदे मंडळाने संमत केला. ‘चलेजाव’ अशी घोषणा गांधीजींनी केली. त्या वेळी जनताही स्वातंत्र्याच्या लढय़ात उतरली होती.
असे असताना अमळनेर शांत होते. ही बाब सानेगुरूजींना सहन झाली नाही. त्यांनी डॉ. उत्तमराव पाटील यांना चिठ्ठी लिहली.‘..अशा गंभीर प्रसंगी माझा खान्देश शांत का? अमळनेरची जनता जर काहीच करणार नसेल तर याच अमळनेरातील पाच कंदील समोर मी माङया शरीराची होळी करेल..’ गुरूजींचा संदेश अमळनेरकरांच्या ह्रदलाला भिडला. आंदोलनाचे नेतृत्व क्रांतीविरंगना लीलाताई उत्तमराव पाटील यांनी केले. लीलाताईंनी सभा घेतली. त्यात सानेगुरूजींचा संदेश वाचून दाखवला.
14 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीकारकांनी अमळनेरातील सरकारी कार्यालयांची होळी करण्याचा सपाटाच लावला. क्रांतीकारकांनी मामलेदाराच्या टांग्याची होळी केली. त्यानंतर टपाल कार्यालय जाळले. तेथून मोर्चा रेल्वस्थानकाकडे वळला. रेल्वे स्टेशन जाळून त्याचे स्मशान केले. क्रांतीकारक तेवढय़ावरच थांबले नाहीत तेथून ते माळी वाडय़ातील कोर्टाकडे गेले. कोर्टाची राख केली.
पूर्वी ज्याठिकाणी मोकळे मैदान होते, तेथे आता नवीन टपाल कार्यालय आहे. तर रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण झालेले आहे. पण माळीवाडय़ात त्याकाळी जाळलेले ‘कोर्ट’ भगAावस्थेत आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. कोर्टाचीच दगडी चिरेबंदी आजही भक्कमपणे उभी आहे.
स्वातंत्र्य संग्रामात अमळनेरकरांनी केलेल्या अमूल्य कामगिरीची साक्ष देत कोर्टाच्या विटांच्या भिंती उभ्या आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच ज्यांनी-ज्यांनी या क्रांतीपर्वात सहभाग घेतला त्यांची आठवण म्हणून किमान पुतळे तरी उभारले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होवू लागली आहे.