अपघात झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी जाणाऱ्या काकू अपघातात ठार
By विजय.सैतवाल | Published: January 5, 2024 03:24 PM2024-01-05T15:24:27+5:302024-01-05T15:24:58+5:30
काका जखमी : महामार्गावर आयटीआटजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : अपघात झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी निघालेल्या काका-काकुच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पुष्पा गुणवंत पाटील (६६, रा. प्रेमनगर) या ठार झाल्या तर गुणवंत पाटील (७०, रा. प्रेमनगर) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, ५ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ (आयटीआय) झाला.
गुणवंत पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक असून ते पत्नी पुष्पा पाटील यांच्यासह प्रेमनगरमध्ये राहतात. त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे पती-पत्नी कोल्हे नगरमध्ये जात होते. महामार्गावर आयटीआय जवळ आलेले असतान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात हे दाम्पत्य खाली पडले. त्या वेळी त्यांना काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. मयत पुष्पा पाटील यांना एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आहे. मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे.
वर्दळ कमी असते म्हणून निघाले लवकर
पुतण्याला पाहण्यासाठी जायचे ठरल्याने सकाळी महामार्गावर वर्दळ कमी असते म्हणून पाटील दाम्पत्य सकाळी लवकर निघाले. मात्र ज्या वर्दळीमुळे अपघाताची शक्यता असते, तीच वेळ या दाम्पत्यावर आली व सकाळीच अपघात होऊन पुष्पा पाटील यांना जीव गमवावा लागला.
माझे पाय दाबून दे...
अपघातानंतर पती-पत्नीला रुग्णालयात नेले त्या वेळी दोघेही बोलत होते. परिसरातील काही नागरिक, तरुण तेथे पोहचले त्या वेळी पुष्पा पाटील यांनी माझा हात वर उचलून दे, पाय दाबून दे असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली, असे प्रेमनगरमधील रहिवासी विशाल जगताप यांनी सांगितले.