धरणगावच्या अभियंत्याचा औरंगाबादला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:13 PM2018-10-23T23:13:15+5:302018-10-23T23:17:22+5:30
औरंगाबाद येथे नोकरीस असलेल्या राकेश गोपाल महाले (वय- ३८) या अभियंत्याचा न्यूमोनिया व डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाल्याची घटना २२ रोजी घडली.
धरणगाव : येथील मूळचे रहिवासी व औरंगाबाद येथे नोकरीस असलेल्या राकेश गोपाल महाले (वय- ३८) या अभियंत्याचा न्यूमोनिया व डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाल्याची घटना २२ रोजी घडली.
धरणगाव येथील रहिवासी गोपाल रामदास महाले (ह.मु.भिलाई, छत्तीसगड) यांचा सिव्हील इंजिनियर असलेला मुलगा राकेश गोपाल महाले हा गेल्या तीन वषार्पासून पैठण, औरंगाबाद येथे एका कंपनीत अभियंता म्हणून काम करीत होता. त्याची चार/पाच दिवसापूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप, सर्दी, न्यूमोनिया तसेच डेंग्यू सदृश्य आजाराचे लक्षणे असल्याचे त्यांच्या परिवाराने सांगितले. उपचारादरम्यान २२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे शव २३ रोजी धरणगावला आणून येथे अंत्यविधी केला.
मयत राकेशचे वडिल गोपाल महाले यांना दहा वर्षापूर्वी मधुमेहामुळे अंधत्व आले आहे. घरातला कर्ता मुलगा गेल्याने आई-वडिलांचा तसेच त्याच्या पत्नीच्या आक्रोशाने सर्वांचे हृदय हेलावले. मयत राकेश यास एक चार वर्षाचा व दुसरा दीड महिन्याचा मुलगा आहे. मयत राकेश हा येथील कमल जिनींगचे संचालक दिलीप महाले यांचा पुतण्या आहे.