लहान मुलांमधील स्वमग्नता चिंतेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 09:55 PM2019-12-16T21:55:19+5:302019-12-16T21:55:29+5:30
जळगाव : लहान मुलांमध्ये वाढणारी स्वमग्नता (आॅटीझम) हा एक चिंतेचा विषय आहे. त्यांच्यावर उपचार करताना त्या-त्या बालकाला वेगळ्या पातळीवर ...
जळगाव : लहान मुलांमध्ये वाढणारी स्वमग्नता (आॅटीझम) हा एक चिंतेचा विषय आहे. त्यांच्यावर उपचार करताना त्या-त्या बालकाला वेगळ्या पातळीवर हाताळण्याची गरज आहे, असा सूर येथील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या मानसोपचारतज्ञांच्या सहाव्या वार्षिक परिषदेत निघाला.
जळगाव मानसोपचारतज्ज्ञ सोसायटीतर्फे आयोजित या परिषदेची सांगता रविवारी सायंकाळी झाली. यावेळी विविध मानसोपचाराशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांची भाषणे झाली.
यावेळी नागपूरच्या विवेक किरपेकर यांनी इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. आपल्याला दिसणाºया लक्षणावरून हल्ली इंटरनेटवरून सर्च करून आपल्याला हाच आजार असल्याची समजूत अनेकजण करून घेतात. त्यातून त्यांना नैराश्य येते. कोणत्याही रुग्णांनी लक्षणे दिसली म्हणून इंटरनेटची मदत घेऊन आपला आजार ठरवणे हे चुकीचे आहे, असे ते
म्हणाले.
एखाद्या मानसिक रुग्णाला हाताळताना त्याची मानसिकता काय आहे, नैराश्याची कारणे काय आहेत? याचा विचार करूनही मानसोपचारतज्ज्ञांनी त्यांच्यावर औषधोपचार चालू केले पाहिजेत. आज अनेक प्रकारची औषधे बाजारात उपलब्ध आहेत, त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांची उपचार करताना भूमिका आणखीन महत्त्वाची ठरत आहे, असे पुणेतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप पारखी यांनी सांगितले.
मुंबईतील डॉ. अमित मुथा यांनी लैंगिक दुर्बलता, त्याची कारणे आणि त्यावर नव्याने बाजारात दाखल झालेली औषधे या विषयावर मानसोपचारतज्ज्ञांना मार्गदर्शन केले. पुणे येथील डॉ. भूषण शुक्ल यांनी लहान मुलांमध्ये स्वमग्नता हा आजार वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मेंदूला इजा होणे वा अशा अनेक कारणांपासून हा आजार होतो, असे ते म्हणाले.
जळगाव, धुळे, नाशिकमधील जवळपास २५ ते ३० मानसोपचारतज्ज्ञ या परिषदेसाठी उपस्थित होते.