भुसावळ रेल्वे स्थानकावरील स्वयंचलीत जिने जूनअखेर कार्यान्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:38 PM2018-06-10T18:38:31+5:302018-06-10T18:38:31+5:30
देशभरातील संपूर्ण दिशांकडून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचे स्थानक असलेल्या भुसावळ येथील रेल्वे स्थानक हायटेक करण्याला गती मिळाली असून स्वयंचलीत जिन्यांचे काम पूर्ण होऊन ते जूनअखेर खुले होणार आहेत. तसेच रेल्वे प्रवासी गाड्यांची संख्या वाढल्याने दोन फलाटांची उभारणी सुरू असून ते आॅगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत.
लोकमत आॅनलाईन
भुसावळ, दि.१० : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे प्रशासनाने स्थानक हायटेक करण्यासाठी तसेच स्थानकावर प्रवाशांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देता याव्या या उद्देशातून स्वयंचलीत जिने उभारणीचे काम सुरू केले असून जून अखेरपर्यंत हे जिने प्रवाशांना वापरासाठी खुले करण्यात येणार आहेत. तर नविन फलाट क्रमांक ९ व १० यांच्या उभारणीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असून आॅगस्टपर्यंत प्रवाशी गाड्या या फलाटांवर लागतील अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.
मध्य रेल्वेच्या अत्यंत महत्वाच्या अशा भुसावळ स्थानकावर फलाट क्रमांक एकला लागून दोन नवीन फलाटांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तिसरा व चौथा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर हे फलाट या मार्गाला जोडले जातील . फलाट ९ आणि १० सहाशे मीटर लांबीचे राहतील तर रुंदी १५ मीटर इतकी राहील. फलाटांच्या उभारणीसाठी ५० ते ६० कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे.
संपूर्ण देशभरातून भुसावळ रेल्वेस्थानकावर ११० पेक्षाही जास्त प्रवासी गाड्या दररोज ये- जा करतात. दोन नवीन फलाट उभारणीनंतर प्रवाशांची गर्दी कमी होण्यासाठी ते सोयीचे ठरणार आहे . शिवाय प्रवासी गाड्यांच्या संख्येतही यामुळे वाढ होणार आहे. त्यामुळे फलाटांचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या आॅगस्टपर्यंत ते दोन्ही प्रवाशांसाठी वापरात येणार आहेत.
स्वयंचलित जिने महिनाअखेर सुरू
भुसावळ रेल्वे स्थानकासाठी अनेक वर्षापासून मागणी असलेले स्वयंचलित जिन्यांचे काम युद्धस्तरावर सुरू असून या महिन्याच्या अखेरपर्यंत ते देखील प्रवाशांसाठी खुले होणार आहे. यामुळे वयोवृद्ध, महिलांसाठी मोठी सोय होणार आहे. डाऊन स्वयंचलित जिनेही प्रस्तावीत
सध्या रेल्वे स्थानकावर जाण्या- येण्यासाठी स्वयंचलित जिन्याचे काम सुरु आहे. ते कार्यान्वित झाल्यानंतर उतरण्यासाठीही (डाऊन) स्वयंचलित जिने प्रस्तावधिन असून त्यांचेही कार्य लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आर. के. यादव यांनी लोकमतला दिली.