लोण्यातून साकारलेला 'अवचित हनुमान'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:39+5:302021-04-27T04:16:39+5:30
जितेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : जळगाव तालुक्यातील रिधूर शिवारात तापी नदीलगत अवचित हनुमानाचे पुरातन मंदिर आहे. विशेष ...
जितेंद्र पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : जळगाव तालुक्यातील रिधूर शिवारात तापी नदीलगत अवचित हनुमानाचे पुरातन मंदिर आहे. विशेष म्हणजे याठिकाणी हनुमानाची मूर्ती एखाद्या पाषाणातून नव्हे तर भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारली आहे आणि उन्हाळ्यातील ४४- ४५ डिग्री तापमानातही मूर्तीवरील लोणी वितळत नाही. अचानक प्रगटला म्हणून अवचित नावाने ओळखल्या जाणाऱ्या या हनुमान मंदिराची अख्यायिकासुद्धा प्रसिद्ध आहे.
अवचित हनुमान मंदिर क्षेत्राचा गेल्या काही वर्षात मोठा विकास झाला आहे. त्याठिकाणी उंच गाभारा असलेल्या मंदिरासह भव्य सभामंडपाची व्यवस्था केली असून, त्यात विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. याशिवाय लग्नाचे विधीही पार पडतात. १९८६ मध्ये नगर जिल्ह्यातील कोळगाव येथून आलेले स्वामी माधवदास यांचे अवचित हनुमान मंदिराच्या कायापालटात मोठे योगदान राहिले आहे. महसूल विभागाच्या दप्तरी 'मौजे मत्याणे', अशी नोंद असलेल्या अवचित हनुमान मंदिर परिसराला काळाच्या ओघात भग्नावस्था आली होती. मात्र, स्वामी माधवदास यांच्या प्रयत्नांनी ते पुन्हा नावारूपास आले. या तीर्थक्षेत्राची देखभाल स्वामींच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी कौशल्यादास या पाहतात.
-------------------
अशी आहे अख्यायिका...
सध्या अस्तित्वात असलेल्या अवचित हनुमान मंदिरालगत कधीकाळी खूप मोठे वडाचे झाड होते. त्याखाली आजूबाजूच्या परिसरातील गुराखी त्यांची जनावरे चारण्यासाठी आल्यावर थोडावेळ विश्रांती घ्यायचे. एके दिवशी एका गुराख्याला स्वप्न पडले, की वडाच्या झाडाखाली एक हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. जमीन खोदून मूर्ती वर काढल्यावर तिची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर तुमच्या गावाचे कल्याण होईल, असा दृष्टांत त्याला मिळाला. जवळपास सर्वच गुराख्यांना स्वप्नात तसा दृष्टांत मिळाल्यावर गावात चर्चा सुरू झाली. त्यादृष्टीने गावकऱ्यांनी वडाच्या झाडाखाली खोदकाम सुद्धा सुरू केले. मात्र, गावातील मोठ्या जमीनदाराने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. मात्र, काही दिवसांनी जमिनदारालाही स्वप्नात हनुमानाचा दृष्टांत मिळाला. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांनी जमिनीतून हनुमानाची मूर्ती बाहेर काढून तिची त्याच ठिकाणी बांधलेल्या मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. अचानक प्रगटलेल्या हनुमानाला त्या दिवसापासून 'अवचित हनुमान' संबोधले जाऊ लागले.
म्हणून लोण्याचा मारोती अशी ओळख
दरम्यानच्या काळात गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे एक जवळचे नातेवाईक मुक्कामी थांबले होते. माझ्या गोठ्यातील दूध न देणारी म्हैस पूर्ववत दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवेल, असे बोलून त्यांनी अवचित हनुमानाला साकडे घातले. आश्चर्य म्हणजे त्यांच्या म्हशीने दुसऱ्याच दिवशी भरपूर दूध दिले. कबूल केल्यानुसार सदर व्यक्ती एका मडक्यात लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिराकडे निघाली. चालत आल्याने त्यांना अंधार होण्याआधी अवचित हनुमानाचे मंदिर गाठता आले नाही. त्यामुळे सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने त्यांनी लोण्याचे भांडे छताला टांगून त्यादिवशी नातेवाईकांकडेच मुक्काम केला. दुर्दैवाने त्या रात्री ज्यांच्याकडे ते मुक्कामी थांबले होते त्यांच्या घराला अचानक आग लागली. आगीत सगळे काही जळून खाक झाले. पण लोण्याचे छताला टांगलेले मडके जशाचे तसे राहिले. नंतर त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढविण्याची प्रथा सुरू देखील झाली. त्यात आजतागायत कोणताच खंड पडलेला नाही.
---------------------
यंदाची हनुमान जयंती साधेपणाने
रिधूरच्या अवचित हनुमान मंदिरावर दरवर्षी हनुमान जयंतीला दर्शनासाठी भाविकांची मोठी रिघ लागते. चैत्र चतुर्दशीच्या दिवशी रात्रीच तिथे भाविक दाखल होत असतात. यादिवशी तिथे महाप्रसादाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मर्यादित स्वरूपात सकाळी साडेचार वाजता अभिषेक तसेच पाच वाजता चोला चढविण्यासह सहा वाजता आरती तेवढी होणार आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी दीपक महाराज यांनी दिली.
----------------
फोटो-
रिधूर येथील लोण्यातून साकारलेल्या अवचित हनुमानाची विलोभनीय मूर्ती.