अवघा रंग एक जाहला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:57 PM2020-08-06T12:57:04+5:302020-08-06T12:57:12+5:30

रांगोळी, गुढी उभारून आनंद साजरा : राम मंदिर भूमिपूजनाचा अपूर्व उत्साह

Avagha Rang Ek Jahla ..! | अवघा रंग एक जाहला..!

अवघा रंग एक जाहला..!

Next


जळगाव : अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडला आणि हा दिवस जळगावातील नागरिकांनीही जणू दीपावलीच साजरी केली. प्रभू श्रीरामचंद्र वनवासातून परतल्यानंतर गुढी उभारून अयोध्येत त्यांचे स्वागत करण्यात आले होते, तसाच आनंद आज प्रत्येक घराघरात दिसून येत होता. कुणी गुढी उभारली, कुणी भगवा ध्वज फडकावला, कुणाच्या घरात गोडधोडचा बेत करण्यात आला तर कुणी फटाके फोडले. जणू घराघरात आज भगवेच वातावरण होते. संत सोयराबाई यांच्या अभंगाप्रमाणे अवघा रंग जणू एक झाला हाता.
दुपारी १२.४० मिनिटांच्या मुहुर्तावर अयोध्येत श्रीराम मंदिराचा भमिपूजन सोहळा पार पडला आणि घराघरात रंगला इकडे शहरातही उत्साहाला उधाण आले होते. अनेक ठिकाणी हा जल्लोष साजरा करण्यात आला. परस्परांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. काही ठिकाणी महारांगोळी काढण्यात आली होती. सायंकाळी अनेक घरांसमोर दीप प्रज्ज्वालित करण्यात आले. शहरातील अनेक चौकांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
पिंप्राळा रस्त्यावरील भवानी मंदिर व गोरक्षनाथ मंदिर भगव्या ध्वजांनी सजविण्यात आले होते.
श्रीराम मंदिरांना आकर्षक रोशणाई
श्रीराम मंदिरांवर आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली होती. चिमुकले राम मंदिरही रोशणाईने झगमगून गेले होते तर ग्रामदैवत श्रीराम मंदिरातही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

श्रीराम मंदिरात पंचनद्यांचा जलाभिषेक
जुने जळगावताील प्रभू रामरायांच्या पंचायतन उत्सवमूर्तीस पवित्र श्रीक्षेत्र नाशिक येथून श्री गोदावरी, श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्री चंद्रभागा, श्री क्षेत्र मेहुण मुक्ताई येथून सूर्यकन्या श्री तापी नदी व श्री क्षेत्र जळगाव श्री गिरणामाई आदी पंचनद्याच्या जल व पंचामृत अभिषेक करण्यात आला. सकाळी वेदमंत्र पठण तर दुपारी प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. सायंकाळी हरिपाठ व रामपाठ तर त्यानंतर श्रीरामरक्षास्तोत्र पठण झाले. त्यानंतर श्रीधर जोशी यांचे कीर्तन झाले. यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

-श्रीराम मंदिर भूमीपूजनाचा जेवढा उत्साह अवध नगरीत होता, तेवढाच उत्साह शहरातील रामभक्तांमध्ये दिसून आला. सोबतच विविध कार्यक्रमांनी सकाळपासून शहरात चैतन्यमय वातावरण पहायला मिळाले.
-विविध संस्था संघटनांनी प्रभू श्रीरामांचा जयघोष करण्यासह अनेक संस्थांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत शहरातील चौका-चौकात रांगोळ््या काढल्या. यामुळे शहरातील चौक रांगोळ््यांनी सजले होते.
-कोर्ट चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक इत्यादी ठिकाणी भव्य रांगोळ््या काढण्यात आल्या होत्या. तसेच घरांचे अंगणही रांगोळ््यांनी सजले होते.

तानाजी मालुसरेनगर येथे गुढी
तानाजी मालुसरे नगर येथे घरासमोर गुढी उभारून आणि रांगोळी काढून प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी घरात गोडधोडचा बेतही करण्यात आला होता.

-महापौर भारती सोनवणे यांनीही भगवा ध्वज फडकावून हा आनंद साजरा केला. मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा यांच्या दालनात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. .
-एनएसयुआयतर्फे प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेसोबतच छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले.

Web Title: Avagha Rang Ek Jahla ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.