अविरत रुग्णसेवा केली : डॉ़ चौधरी, मग.. आता घरी बसा : डॉ़ लहाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:00 PM2020-06-12T12:00:34+5:302020-06-12T12:00:45+5:30
कारवाईस कनिष्ठ डॉक्टरांचा विरोध : निलंबनावरून मतभेद : सेवा काढून घेण्याचा आयएमएचा इशारा
जळगाव : वृद्धेच्या मृत्यूप्रकरणात अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरेंसह तीन जणांच्या निलंबनाचे आदेश प्राप्त होताच कोविड रुग्णालयात खळबळ उडाली. सर्व कनिष्ठ डॉक्टर्सनी अधिष्ठाता यांचे दालन गाठले़ दरम्यान, यातील डॉ़ सुयोग चौधरी यांनी संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये व्यथा मांडली़ ‘आपण दोन महिने अविरत सेवा दिली़’ मात्र, लहाने यांनी आता घरी बसा असे सांगत त्यांची मागणी फेटाळून लावल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्हावासीयांच्या जखमेवर निलंबनाचा मलम लावण्यात आला असला तरी मृत्यूदर नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान कायम राहणार आहे. दुसरीकडे कोविड रुग्णालयातील सेवा काढून घेण्याचा इशारा आयएमएने दिला आहे.
डॉ़ खैरे यांच्यासह डॉ़ सुयोग चौधरी व कनिष्ठ निवासी डॉ़ कल्पना धनकवार यांच्या निलंबनाचे आदेश सायंकाळी प्राप्त झाले़ हे आदेशांच्या अनुषंगाने प्रशासक डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी तत्काळ अधिष्ठाता यांच्या दालनाबाहेर असलेल्या मिटींग रुममध्ये तातडीने बैठक घेतली़ सर्व डॉक्टरांना आदेश सांगितले़ डॉ़ मारूती पोटे यांच्याकडे पदभार सोपविला़ यावेळी कनिष्ठ निवासी डॉक्टर्सनी प्रशासकांची भेट घेऊन मुद्दे मांडले़
डॉ. लहाने यांना आले १०० फोन
भुसावळ येथील मालती नेहते या कोरोना बाधित बेपत्ता महिलेचा मृतदेह आठ दिवसांनी कोविड रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळून आल्यानंतर बुधवारी रात्री संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये प्रशासनाची झाडाझडती घेतली. जळगावच्या या प्रकरणावरून आपल्याला दिवसभरातून शंभर फोन येऊन आल्याचे त्यांनी सांगितले.
सेवा काढून घेण्याचा आयएमएचा इशारा
डॉ़ सुयोग चौधरी व डॉ़ कल्पना धनकेवार यांचे निलंबन हे चुकीचे असून काही प्रश्न उपस्थित करीत या कारवाईचा निषेध करीत असल्याचे आयएमए हॉस्पीटल बोर्डचे कोषाध्यक्ष डॉ़ अनिल पाटील यांनी म्हटले आहे़ खासगी रुग्णालय व कोविड रुग्णालयात आयएमएतर्फे देण्यात येत असलेली सेवा आम्ही थांबविण्याचा विचार करू शकतो, असा इशारा या कारवाईवरून त्यांनी दिला आहे़ डॉ़ सुयोग चौधरी हे एकटे १२० रुग्ण हाताळत होते़ रुग्ण बेपत्ता असल्याची त्यांनी २ जून रोजीच पोलिसात तक्रार दिली होती़ पोलीस, स्वच्छता कर्मचारी, नर्स यांनी का तपास केला नाही? मोठ्या अधिकाऱ्यांना सोडून मेहनती छोट्या डॉक्टरांना बळीचा बकरा या प्रकरणात बनविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ दरम्यान, या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी तसेच राज्याच्या आयएमए अध्यक्षांना उद्या निवेदन देणार असल्याचे अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील यांनी म्हटले आहे़
कोविड असल्याने संप नाही
जी घटना घडली ती वाईटच मात्र, आम्ही सर्वांनी २ रोजीच पोलिसांना कळविले होत़े अशा वेळी त्यांचीही जबाबदारी होती तपासाची अशा स्थितीत शौचालच तपासले नाही, म्हणून डॉक्टर्सवर होणारी निलंबनाची कारवाई गैर आहे़ आधीच डॉक्टर्सची संख्या कमी आहे़ जे आहेत ते डॉक्टर २३ तास सतत काम करीत असतात, अशा स्थितीत कारवाई होत असेल तर काय करावे, असे मत कनिष्ठ डॉक्टर्सनी प्रशासनकडे निवेदनाद्वारे मांडले. कोविडमुळे कुठलेही आंदोलन किंवा संप करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे़
१६ डॉक्टर्स पाठविणार
डॉक्टर्सची संख्या कमी असल्याचा मुद्दा काही अधिकाऱ्यांनी व्हिसीत मांडला असता आपण तात्काळ दुसºया जिल्ह्यातून डॉक्टर्स व परिचारिकांना पाठविणार असल्याचे डॉ़ लहाने यांनी सांगितल्याची माहिती आहे़ यानुसार येत्या एक दोन दिवसात १६ डॉक्टर्स व २० परिचारिका रूजू होणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्व कक्षांमध्ये सीसीटीव्ही
कोविड रुग्णालयाच्या सर्व कक्षाच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ डॉक्टर्स नेमके कक्षात जातात की नाही यावरून समजाणार आहे, अशी माहिती प्रशासक डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी दिली़ दरम्यान, कक्षांच्या तपासणीची व किती कर्मचारी आहेत नाहीत याच्या नियमित तपासणीची जबाबदारी अधीक्षकांकडे सोपविली असल्याची माहिती त्यांनी दिली़
प्रामाणिकपणे मन लावून ड्युटी करणाºया ज्युनिअर डॉक्टर्सवर कारवाई ? नर्स, वॉडबॉय, मुकादम, सुपरवायझर, पोलीस, तपासाधिकारी यांची काहीच जबाबादारी नाही का? सर्व चूक डॉक्टरचीच? या कारवाईचा तीव्र निषेध करायला हवा. - डॉ़ राजेश पाटील, बालरोग तज्ज्ञ
जे डॉक्टर मेहनत घेत आहेत जे रुग्णालयाचा मुख्य कणा आहेत़ आधिच डॉक्टरांची संख्या कमी असताना अशा प्रकारच्या कारवाईने अन्य डॉक्टर अशा वातावरणात कसे काम करू शकतील ?
-डॉ़ स्रेहल फेगडे, सचिव आयएमए
...शोधही घ्यायला हवा होता
डॉ़ सुयोग चौधरी व डॉ़ कल्पना धनकेवार यांचे ज्या दिवशी महिला बेपत्ता झाली त्या दिवशी ड्युटी शेड्युल्ड होते़ त्यामुळे रुग्ण कुठे गेला यााबबत केवळ पोलिसात तक्रार देण्यापुरते नव्हेतर स्वत: शोध घेण्याची जबादारीही होती़ असा ठपका ठेवण्यात आल्याचे समजते़