जिल्ह्यातील अवैध वाळूला आळा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:23 PM2019-12-16T22:23:45+5:302019-12-16T22:24:03+5:30
डॉ.उल्हास पाटील : महसूल मंत्र्यांकडे तक्रार
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सुरु असलेला अवैध वाळूचा उपसा व सरकारी यंत्रणेशी असलेली मीलीभगत याबाबत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सोमवारी थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. थोरात यांनी त्याची गंभीर दखल घेत तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधल्याची माहिती डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.
सोमवारी अवैध वाळू वाहतुकीने कुसुंबा येथे ईश्वर नथ्थू मिस्तरी (३५) या तरुणाचा बळी घेतला. त्याआधी स्वत: माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील यांच्या कारला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने मागून धडक दिल्याची घटना नशिराबादजवळ महामार्गावर घडली. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉ.पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. जिल्ह्यात कुठेही वाळूचा ठेका गेलेला नाही. असे असताना दिवसरात्र नदीपात्रातून वाळू उपसा सुरु असून शहर व महामार्गावर त्याची बिनधास्त वाहतूक केली जात आहे. सरकारी यंत्रणेने याबाबत पट्टी बांधली आहे. तालुका प्रशासन तर याकडे लक्षच द्यायला तयार नाही, त्यामुळे त्यांचीही तक्रार केल्याची माहिती डॉ.पाटील यांनी दिली.
वाळू वाहतूक करणाºया वाहनांचे चालक मद्याच्या नशेत असून आरटीओ व पोलिसांनी या वाहनचालकांची वैद्यकिय तपासणी केली जावी अशी मागणीही त्यांनी केली.
शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरु आहे. महसूल यंत्रणेचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ही वाहने लोकांच्या जीवावर उठली आहेत. त्यामुळे आज महसूलमंत्र्यांकडे जिल्हा व तालुका प्रशासनाची तक्रार केली.
-डॉ.उल्हास पाटील, माजी खासदार